कोल्हापूर / धीरज बरगे :
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा गूळ हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ज्यादा गुळ रव्यांची आवक झाली आहे. गतवर्षीच्या 23 जानेवारीपर्यंत 15 लाख 37 हजार 671 इतक्या गूळ रव्यांची आवक झाली होती. तर यंदाच्या हंगामात आजपर्यंत 15 लाख 92 हजार 692 इतकी आवक झाली आहे. दोन्ही हंगामातील आकडेवारी पाहता चालू हंगामात 55 हजार रव्यांची जादा आवक झाली आहे. प्रतिवर्षी गूळ उत्पादनाचा आलेख घालावत चाललेल्या जिल्ह्यातील गूळ उत्पादन व्यवसायासाठी ही सकारात्मक बाब आहे.
गुऱ्हाळघरांचा जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख आहे. येथील शेतकऱ्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या दर्जेदार गुळाने कोल्हापूरची ओळख देशभर पोहचवली. जिल्ह्यात एकेकाळी एक हजारहून अधिक गुऱ्हाळ घरे होती. मात्र जसजसा साखर कारखान्यांकडून ऊसाचा दर वाढत गेला तसतसा जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांचा आकडा कमी होत गेला. वाढलेला उत्पादन खर्च, कामगारांची कमतरता, खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी दर अशी अनेक आव्हाने गूळ उत्पादकांसमोर उभारत गेली. अशा या आव्हानात्मक स्थितीत गुऱ्हाळ घरांची मोठ्या प्रमाणात घटली असली तरी आजही सुमारे शंभरहून अधिक गूळ उत्पादकांनी कोल्हापूरी गुळाची ओळख जिवंत ठेवली आहे. गूळ व्यवसाय संकटात असला तरी चालु हंगामात वाढलेली आवक गुळ उत्पादकांना प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात जिल्ह्यात गुळाचे उत्पादन थोड्या फार प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे.
- साखर हंगाम लांबल्याचा फायदा
विधानसभा निवडणुकीमुळे यंदाचा साखर हंगाम सुमारे महिनाभर लांबणीवर पडला. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे चेअरमन हे आमदारकीच्या निवडणुकीत व्यस्त राहिल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु होण्यास विलंब झाला. त्यामुळे साखर कारखान्यांकडे जाणार ऊस काही प्रमाणात गुऱ्हाळ घरांकडे वळाला. याचा फायदा कोल्हापुरच्या गुळ उत्पादकांना झाला.
- सौदे शांततेत, वाढीव दर मिळाल्यास आणखी गती
यंदाच्या हंगामात अपवादात्मक स्थिती वगळता गूळ सौदे शांततेत सुरु राहिले आहेत. प्रतिदिन सरासरी दहा ते बारा हजार गूळ रव्यांची आवक सुरु आहे. गूळ उत्पादकांना यंदा समाधानकारक दर मिळत असला तरी आणखी वाढीव दर मिळाल्यास गूळ उत्पादनाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढली मागणी
कोरोना संसर्गानंतर आहारातील गुळाच्या सेवनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही गुळाला मागणी वाढली आहे. गतवर्षी 1.19 लाख मे.टन इतक्या गुळाची निर्यात भारतातून झाली यामधून 1572 कोटींची उलाढाल झाली.
- जीआय मानांकनबाबत जागृतता आवश्यक
कोल्हापुरी गुळाला कर्नाटकी गुळाचा फटका बसत आहे. कर्नाटकी गुळाला कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून विक्री करण्याचा प्रकार सुरु आहे. या प्रकाराचा फटका जिल्ह्यातील गूळ दराला बसत आहे. जिल्ह्यातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी जीआय मानांकन नोंदणी केल्यास कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली होणाऱ्या कर्नाटकी गुळाच्या विक्रीस चाप बसणार आहे. जीआय मानांकन नोंदणी केल्यास येथील गुळाचा ब्रँड तयार होऊन शेतकऱ्यांना जादा दरही मिळण्यास मदत होणार आहे. मात्र जीआय मानांकन नोदंणीबाबत बाजार समितीसह गूळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उदासिनता दिसत आहे.
- मागील पाच वर्षात कोल्हापूर बाजार समितीमध्ये गुळ रव्यांची झालेली आवक अशी
वर्ष गुळ रव्यांची संख्या (प्रतिकिलो 30 प्रमाणे)
2020-21 23. 14 लाख
2021-22 22.94 लाख
2022-23 22.60 लाख.
2023-24 22.15 लाख
2024-25 15.92 लाख (23 जानेवारीपर्यंत)
- गुळ उत्पादन वाढण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या साखर हंगामाचा फायदा जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांना झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक वाढली आहे. सौदे शांततेत सुरु असून गूळ उत्पादकांना समाधानकारक दर मिळत आहे. आणखी वाढीव दर मिळल्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. यंदाच्या हंगामातील स्थिती पाहता जिल्ह्यात गूळ उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
– जयवंत पाटील, सचिव कोल्हापूर बाजार समिती.








