बेळगाव : स्वच्छ भारत योजनेंतर्गत 100 लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यासह इतर विषयांना गुरुवारच्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. पण बैठकीत अध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना कागदोपत्री स्वरुपात उत्तरे देण्यात अधिकारी असमर्थ ठरले. त्यामुळे संतापलेल्या आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश कांबळे यांनी ही मनपाची बैठक आहे की भाजी मार्केटचा बाजार?, असा कडक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला.
बैठकीत ज्या विषयावर चर्चा केली जाणार आहे, त्या प्रश्नासंबंधी महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून नोटीस काढली जाते. सदर नोटिसीची प्रत सर्व सदस्य आणि अधिकाऱ्यांना दिली जाते. त्यामुळे संबंधित प्रश्नांबाबत सविस्तर माहिती बैठकीत देणे गरजेचे असते. त्याचबरोबर कागदोपत्री पुरावे व आकडेवारी देणेही तितकेच महत्त्वाचे असते. गुरुवारी स्थायी समिती सभागृहात आरोग्य स्थायी समितीची बैठक सुरू झाली. त्यावेळी अध्यक्ष शैलेश कांबळे यांनी प्रामुख्याने व्यापार परवान्याबाबत अधिकारी व आरोग्य निरीक्षकांकडे विचारणा केली.
प्रभागनिहाय माहिती देण्यासंबंधी सूचना केली. पण उपस्थित आरोग्य निरीक्षकांनी आकडेवारीनिहाय माहिती देण्याऐवजी त्रोटक माहिती देण्याचा प्रयत्न केला. याला आक्षेप घेत प्रभागनिहाय किती व्यापार परवाने वितरित करण्यात आले, त्याचबरोबर किती परवान्यांचे नूतनीकरण झाले, या माध्यमातून मनपाला किती महसूल जमा झाला, याची आकडेवारी देण्याची मागणी अध्यक्षांनी केली. त्यामुळे संबंधित निरीक्षकांना सभागृहात अध्यक्षांच्या टेबलसमोरील खुर्च्यांवर बसण्यास सांगितले. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत नाराजी व्यक्त करत अध्यक्षांनी ही मनपाची बैठक आहे की भाजी मार्केटचा बाजार? असा प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.









