आता प्रत्येक जण गर्वाने आपण हिंदू असल्याचे सांगतोय : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरात दौऱ्यावर
वृत्तसंस्था/अहमदाबाद
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभ आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर मोठा निशाणा साधला आहे. अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानावर हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थेकडून आयोजित मेळ्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते गुरुवारी झाला. यावेळी बोलताना शाह यांनी दिल्लीत काही काळापूर्वी हिंदू असल्याचे सांगणे अवघड होते, परंतु आता प्रत्येक जण गर्वाने हिंदू असल्याचे सांगत असल्याचा दावा केला. तसेच शाह यांनी महाकुंभमध्ये युवांना सोबत घेत जाण्याचे आवाहन उपस्थित लोकांना केले आहे. माझ्या जीवनात मी 9 वेळा कुंभला भेट दिली आहे. अर्धकुंभ पाहिला आहे, यंदाच्या महाकुंभमध्ये मी 27 जानेवारी रोजी सामील होणार आहे.
सर्व लोकांनी देखील पवित्र होण्यासाठी तेथे जावे, असे आवाहन शाह यांनी केले. मागील 10 वर्षांमध्ये भारताचा गौरव वाढला आहे. केंद्र सरकारने भारताच्या धार्मिक स्थळांचा विकास घडवून आणला आहे. तसेच भारतातून चोरीला गेलेल्या देवांच्या मूर्ती जगभरातून परत आणल्या आहेत. मागील 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. दहा वर्षांपासून भाजपचे सरकार असून या कालावधीत आमची विचारसरणीशी निगडित कामं पूर्ण झाली आहेत. 550 वर्षांपासून तंबूत राहत असलेले रामलल्ला आता भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. कलम 370 हद्दपार झाले आहे. 7 दशकांपर्यंत ज्या विषयाला कुणी स्पर्श करण्याची हिंमत दाखविली नाही, तो आम्ही निकाली काढला असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
येथे मेळा, तेथे कुंभ…
अहमदाबादमध्ये मेळ्याचे उद्घाटन झाले, तर प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. अनेक देशांच्या लोकांनी आमंत्रणपत्रिका पाठविण्याची सूचना केली होती. परंतु कुंभमेळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रणाची गरज नसल्याचे त्यांना सांगितले आहे. एकाचवेळी 40 कोटी लोक तेथे पोहोचतात. कुंभची व्यवस्था हजारो संत करतात. ते कडाक्याच्या थंडीत जमिनीवर झोपतात आणि गंगास्नान करतात. मुघल, काँग्रेसच्या काळातही कुंभचे आयोजन व्हायचे आणि आजही महाकुंभचे आयोजन अत्यंत सुंदर पद्धतीने होत आहे. महाकुंभममध्ये सामील होण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, 144 वर्षांमध्ये एकदा ही संधी येते, याचमुळे प्रत्येकाने यात सामील होण्याची गरज असल्याचे वक्तव्य शाह यांनी केले आहे.
विकास प्रकल्पांचे उद्घाटन
अमित शाह यांनी गुजरात दौऱ्यादरम्यान सूरत येथे बाबूलाल रुपचंद शाह महावीर कॅन्सर हॉस्पिटल आणि फूलचंदभाई जयकिशनदास वखारिया सेनेटोरियमचे उद्घाटन केले आहे. तसेच साबरमती येथे अहमदाबाद महापालिका आणि रेल्वेविभागाकडून निर्मित डी-केबिन अंडरपासचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याचबरोबर अनेक विकासप्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
महाकुंभचे यशस्वी व्यवस्थापन
महाकुंभमधील गर्दी व्यवस्थापन पाहून पूर्ण जग अचंबित झाले आहे. हजारो वर्षांपासून हे घडत आले आहे. अनेक देशांच्या राजदूतांनी 40 कोटी लोक एकत्र आल्यावर त्यांचे व्यवस्थापन कोण करते, अशी विचारणा केली. सरकारकडून करण्यात आलेले व्यवस्थापन हे खारीच्या वाट्याइतके आहे. कुंभचे आयोजन परकीयांच्या आक्रमणाच्या स्थितीतही होत राहिले आहे. ते कुणीच रोखू शकले नाही असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.









