कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयातील (सीपीआर) प्रशासनाने ठाम भुमिका घेत गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 13 केबिन्स हटविण्यात आल्या. यामुळे सीपीआरमधील कोंडी कमी झाली आहे. उर्वरीत अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने अशीच ठाम भुमिका घेणे गरजेचे आहे.
आता जर या केबिन्स हटवल्या नाहीत तर भविष्यात अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कोणाच्याही दबावाला न जुमानता ‘आता नाही तर कधीच नाही…!’ अशा दृढ निश्चयाने कारवाईने जोर धरावा, अशी मागणी होऊ लागली
न्यायालयाने आदेश देवूनही गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची उदासिनता व राजकीय, सामाजिक, संस्था–संघटनांच्या दबावामुळे सीपीआरमधील अतिक्रमणावर कारवाई होत नव्हती. पण आता सीपीआर प्रशासन अॅक्शनमोडवर येवून प्रत्यक्षात कायवाईही केल्यामुळे रूग्ण व नातेवाईकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी, सीपीआरच्या मुख्यइमारतीच्या शल्यचिकित्सा विभागासमोरील डाव्या बाजूच्या तीन टपऱ्या अद्यापही काढलेल्या नाहीत. प्रशासनाकडून केवळ कुलूप व साखळदंडाने बंधिस्त करण्यात आल्या आहेत.
या टपऱ्या काढू नयेत, यासाठी राजकीय नेते, सामाजिक संस्था–संघटनांकडून सीपीआर प्रशासनावर दबावामुळे खोडा घातला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही संस्था–संघटनांकडून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली जात आहे. काहीजण उर्वरीत केबिन्स न हटविण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह दोन्ही मंत्र्यांनी सीपीआर प्रशाशसनाच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. तरच सीपीआरचा परिसर कायमस्वरूपी मोकळा श्वास घेईल. अन्यथा पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सीपीआर परिसर कोंडला जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
- पार्कींगवरील भार कमी होण्यास मदत
अतिक्रमण केलेल्या टपऱ्या, येणारे रूग्णांसह वाढती वाहनांची संख्या त्यातच नुतनिकरणाचे सुरू असलेले काम यामुळे वाहने लावण्यास जागाच शिल्लक नाही. आता अतिक्रमण काढल्यामुळे पार्कींगसाठी थोडी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पार्कींगचा भार काहीसा कमी झाला आहे. पार्कींगच्या नियोजनासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सीपीआर प्रशासनाने सांगितले.
- न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
सीपीआर आवारातील अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहे. याचे पालन करून अतिक्रमणावर कारवाई केली आहे. सर्वच अतिक्रण काढले जाणार आहे. यामुळे सीपीआरमधील कोंडी कमी होत आहे. पार्कींसाठी उपाययोजना करणार आहे.
डॉ. सत्यवान मोरे , अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय








