कोल्हापूर :
औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांना कमी दरात वीज देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करत वीज बीलाबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. तसेच उद्योजकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिले.
गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतमधील गोशिमा कार्यालयाला आमदार महाडिक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गोशिमा पदाधिकारी, उद्योजक यांच्यासमवेत बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
बैठकीमध्ये उद्योजकांनी महाराष्ट्रातील वीज दर इतर राज्यांप्रमाणे करुन ते पुढील तीन वर्ष स्थिर ठेवावेत. काही उद्योजकांना सबसिडी वेळेत नाही. फाउंड्री अँड इंजिनिअरींग क्लस्टर या प्रकल्पासाठी मंजूर भूखंडावर उभारलेल्या कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी निधी द्यावा. सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी तीन कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशा विविध समस्या उद्योजकांनी आमदार महाडिक यांच्यासमोर मांडल्या. यावर आमदार महाडिक यांनी वीजदराबाबत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासोबत बैठक घेवून तोडगा काढणार असल्याचे सांगितले.
तसेच सबसिडी मिळण्यासाठी पाठपुरावा करु, कॉमन फॅसिलिटी सेंटर, सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग विस्तारासाठी नवीन जागा उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योग वाढीस खीळ बसत आहे. याचा विचार करून कागल औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी विकसित न केलेले आणि विवादात असलेले भूखंड परत घेऊन विस्तारासाठी इच्छुक उद्योजकांना द्यावेत या उद्योजकांच्या मागणीचाही शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतींमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण संस्थांना सक्षम केले जाईल. उद्योजकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
औद्योगिक वसाहतीमधील रस्ते रुंदीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, अखंडित वीज पुरवठा, सुरक्षा व्यवस्था यासह विविध मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील असेही आमदार महडिक यांनी सांगितले. बैठकीला गोशिमा उपाध्यक्ष सुनील शेळके, सचिव संजय देशिंगे, खजानीस अमोल यादव, दीपक चोरगे, मंगेश पाटील, सत्यजित जाधव, राजवर्धन जगदाळे, रामचंद्र लोहार, नचिकेत कुंभोजकर आदी उपस्थित होते.








