सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी आले असता दुर्घटना
बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी आलेल्या गदग येथील दोन मुलांचा मलप्रभा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. बुधवारी ही घटना घडली असून सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. दोन्ही मृतदेह शोधण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. वीरेश मऱ्याप्पा कट्टीमनी (वय 13), सचिन गोपाल कट्टीमनी (वय 14) दोघेही राहणार गदग अशी त्यांची नावे आहेत. ही दोन्ही मुले आपल्या कुटुंबीयांसमवेत सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी आली होती. बुधवार दि. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मुनवळ्ळीजवळ आंघोळीसाठी ते मलप्रभा नदीच्या पाण्यात उतरले होते.
यात्रा आटोपून गावी परतताना सर्व कुटुंबीय आंघोळीसाठी थांबले होते. त्यावेळी वीरेश व सचिन ही दोन्ही मुलेही पाण्यात उतरली होती. बघता बघता कुटुंबीयांसमक्ष ते पाण्यात बुडाले. लागलीच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक धर्माकर धर्मट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध घेण्यात येत होता. अग्निशमन दल आणि एसडीआरएफकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अंधारामुळे बुधवारी रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली असून गुरुवारी सकाळपासून पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सौंदत्ती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कुटुंबीयांसमक्ष दोन मुले नदीत बुडाल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.









