कोल्हापूर / कृष्णात चौगले :
मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर दोन वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राज्यात निर्विवाद यश मिळवून आपले अस्तित्व सिद्ध केले. यावेळी कोल्हापुरातही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काहीअंशी योगदान लाभले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही जिह्यातील शरद पवार गट पूणपणे पिछाडीवर राहिला आहे. संघटनात्मक बांधणी आणि सक्षम नेत्यांअभावी पक्षापुढे आव्हानांचा डोंगर उभा आहे. शरद पवार गटाला कार्यकर्त्यांची भक्कम फळी असणारा नेता शोधण्याची वेळ आली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे महामेरू शरद पवार यांनी तीन पक्षांना एकत्र गुंफून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे पाच वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादीला 2019 मध्ये नवसंजिवनी मिळाली. पण अवघ्या अडीच वर्षातच महाविकास आघाडीला पायउतार करून राज्यात शिंदे–फडणवीस सरकार आल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी विरोधी बाकावर गेली. या कालावधीत शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे–फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला. मूळच्या राष्ट्रवादीमधील एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवार यांच्यासोबत मोजकेच नेते आणि कार्यकर्ते शिल्लक राहिले. जिह्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक वर्षे मूळ राष्ट्रवादीचे जिल्हा नेतृत्व केले. पण ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेल्यामुळे शरद पवार गटाकडे महाजनसंपर्क असलेले नेतृत्व उरले नाही. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या हातात ‘तुतारी’ देऊन शरद पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. पण या निवडणुकीत घाटगे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यामुळे ते सध्या शरद पवार गटापासून दुरावले आहेत.
- महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाची ताकद नगण्य
कोल्हापूर जिह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांची सद्यस्थिती पाहता यामध्ये शरद पवार गटाची ताकद नगण्य आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. जिह्याचे नेतृत्व करण्यासाठी दिवंगत आरोग्यमंत्री दिग्वीजय खानविलकर, माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखा ताकदीचा एकही नेता सध्या शरद पवार गटाकडे नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या पक्षाची उमेदवारी घेतल्यास आपल्याला भक्कम पाठबळ कोण देणार ? हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होण्याची शक्यता आहे.
- पक्षसंघटना वाढीसाठी सक्षम पक्ष नेतृत्वाची उणीव
पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वच पक्षांकडे सक्षम नेतृत्वाची गरज असते. ज्यांच्याकडे संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभा करण्याची क्षमता असते, आक्रमक चेहरा असतो, अशा नेत्याकडेच पक्ष संघटनेचे नेतृत्व दिले जाते. जिह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे मात्र अशा नेतृत्वाची मोठी उणीव आहे. त्यामुळे सध्या जे कार्यकर्ते शरद पवार गटामध्ये आहेत, ते उद्या तेथे असतीलच असे नाही असा अंदाज पक्षातीलच एका प्रमुख कार्यकर्त्याने वर्तवला आहे.








