रोख रक्कम, चार्जर, इंटरनेट मोडेम लंपास
बेळगाव : हलगा येथील स्टील व सिमेंटचे दुकान फोडून 1 लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून हिरेबागेवाडी पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. महालक्ष्मी स्टील ट्रेडर्स व भारती सिमेंट या दुकानाच्या गोदामाशेजारील कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरटे आत शिरले आहेत. गल्ला फोडून 1 लाख रुपये रोख रक्कम, चार्जर, इंटरनेट मोडेम आदी साहित्य पळविण्यात आले आहे. प्रशांत निंगप्पा देवतकट्टी यांनी हिरेबागेवाडी पोलिसांना माहिती दिली आहे. हलगा, बस्तवाड, तारिहाळ रोड परिसरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. या परिसरातील दुकाने लक्ष्य बनविण्यात येत आहेत. पोलिसांनी हलगा परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे. स्टील व सिमेंटचे दुकान फोडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.









