बेळगाव : महापालिकेच्या सफाई कामगारांना अल्पोपाहार व अंडी वितरण कार्यक्रमाच्या योजनेचा महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, आमदार राजू सेठ आणि मनपा आयुक्त शुभा बी. यांच्या हस्ते बुधवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे शुभारंभ करण्यात आला. बुधवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे अल्पोपाहार व अंडी वितरण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, आमदार राजू सेठ, मनपा आयुक्त शुभा बी. व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी योजनेचा शुभारंभ करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपस्थित सफाई कामगारांना मान्यवरांच्या हस्ते अल्पोपाहार व अंडी देऊन योजनेला सुरुवात करण्यात आली. शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याची महापालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर आता त्यांना अल्पोपाहार व प्रत्येकी एक अंडे देण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेला 17 जानेवारी रोजी प्रारंभ होणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. बुधवारी योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या सफाई कामगारांना दररोज सकाळी अल्पोपाहार व अंडे देण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नियमित ऑनलाईन वेतन घेणाऱ्या व कंत्राटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दररोज 1318 सफाई कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अल्पोपाहार पुरवण्याची जबाबदारी इंदिरा कॅन्टीनच्या ठेकेदाराकडे सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या कचरावाहू वाहनांवरील चालक व वाहकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यावेळी व्यासपीठावर महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी, सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.









