कोल्हापूर / पूजा मराठे :
इलेक्ट्रीक (ईव्ही) गाड्यांमध्ये अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये दुचाकी, चारचाकी तर आहेतच. पण आता तीन चाकी म्हणजेच रिक्षांचीही अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत. इलेक्ट्रीक गाड्यांवर शासनाची सबसिडी तर आहेत, शिवाय गाड्यांचा चार्जिंगचा खर्च हा सीएनजी किंवा कमर्शियल एलपीजी गाड्यांच्या इंधन खर्चापेक्षा कमी आहे, तसेच ईव्ही रिक्षांमुळे वायु प्रदुषण देखील होत नाही. तरीही इलेक्ट्रीक रिक्षांकडे व्यवसायिकांनी मात्र पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. 2017 ते 2024 अखेर जिह्यात केवळ 34 इलेक्ट्रिक रिक्षांची नेंदणी झाली आहे.
शहरातील टाऊन हॉल ते सीबीएस या रस्त्यांवर सर्वात जास्त प्रदुषित हवा असल्याचे उघड झाले आहे. याच रस्त्यांवर रिक्षांची वर्दळही मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे जर ग्राहकांनी ईव्ही रिक्षांच्या पर्यायाची निवड केली तर, शहरातील प्रदुषण नियंत्रण ठेवण्यात त्यांचा खारीचा वाटा होऊ शकतो. गेल्या सात वर्षात जिह्यात केवळ 34 इलेक्ट्रीक रिक्षांची नोंदणी झाली आहे. सीएनजी किंवा कमर्शियल एलपीजी गॅसवर चालणाऱ्या रिक्षांच्या तुलनेत या इलेक्ट्रीक रिक्षा परवडणाऱ्या आहेत. सीएनजी किंवा कमर्शियल एलपीजी रिक्षा ही दोन ते अडीच लाखांपर्यंत खरेदी करता येते. तर ईव्ही रिक्षा ही सव्वातीन ते साडे तीन लाखांपर्यंत मिळते. या रिक्षाची किंमत थोडी जास्त असली तरी वर्षभर या गाड्यांचा देखभालीचा कोणताही खर्च येत नाही. तसेच इंजिन ऑईलचाही खर्च नाही.
अन्य रिक्षांना रोजचे 300 ते 400 रुपयांचे इंधन लागते. तिथे ईव्ही रिक्षांचा महिन्याकाठी चार्जिंगचा खर्च हा दोन ते अडीच हजारांपर्यंत जातो. त्यामुळे सरासरीचा विचार करता ईव्ही रिक्षा या सध्याच्या घडीला परवडणाऱ्या आहेत. ईव्ही रिक्षा या महिन्याला फक्त दोन किंवा तीन रिक्षांची विक्री होते. या उदासीनतेमागे या गाड्यांच्या बॅटरीच्या खर्चाचे घबाड दडलेले आहे. ग्राहकांशी चर्चा केली असता. ईव्ही रिक्षांची बॅटरी जेव्हा बदलण्याची वेळ येते तेव्हा अचानक 80 हजार ते 1 लाखांपर्यंतचा खर्च त्यांना मोठा वाटत असल्याचे दिसले. पण महिन्याकाठी रिक्षाच्या इंधन खर्चात होणाऱ्या बचतीपुढे हा खर्च केवळ 25 टक्के इतकाच आहे. शिवाय या ईव्ही रिक्षांच्या बॅटरीची किंमत देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. या रिक्षांच्या बॅटरीला 1 लाख 20 किलोमीटर किंवा पाच वर्ष अशी वॉरंटी दिली असली तरी दहा वर्ष चालू शकतात. ईव्ही रिक्षाचा खर्च 40 पैसे प्रति किलोमीटर इतका येतो तर सीएनजी गाडीचा 2.73 रुपये प्रतिकिलोमीटर इतका खर्च येतो. शिवाय डीझेल गाड्यांना तर साधारण 4 रुपये प्रतिकिलोमीटर इतका खर्च येतो. ज्या रिक्षा चालकांना लांब अंतरावरचे भाडे असते त्यांना चार्जिंग संपले तर ती पुन्हा चार्जिंग करणे गैरसोयीचे वाटते. पण गेल्या काही वर्षांत सर्वच मार्गांवर अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध असल्यामुळे लांबचे भाडे असेल तरी देखील चार्जिंग स्टेशनवर चार्जिंग करणे सहज शक्य आहे.
- सीएनजी रिक्षांद्वारे प्रदुषण कमी तर ईव्ही रिक्षा प्रदुषणमुक्त
सीएनजी रिक्षांमध्ये सध्या ‘बी एस 6’ नामांकनाचे मॉडेल उपलब्ध आहे. ज्यामुळे कमी प्रदुषण होते. तर ईव्ही रिक्षा या प्रदुषणमुक्त आहेत. पण त्या रिक्षांचा रोजचा इंधनाचा खर्च आणि देखभालीचा खर्च जवळपास डीझेलच्या रिक्षांइतकाच येतो. त्यामुळे इलेक्ट्रीक रिक्षा किंमतीत जरी जास्त वाटत असली तरी हा परवडणारा पर्याय आहे. त्यासाठी प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज आहे. यामध्ये दसरा चौक, संभाजीनगर बस स्टॅण्ड किंवा रिक्षा स्टॉप अशा प्रमुख ठिकाणी चार्जिंग स्टेशनची गरज आहे.
- इलेक्ट्रीक रिक्षा व्यवसायिकांसाठी खूप फायदेशीर
मी 2023 च्या दिवाळी मध्ये इलेक्ट्रीक रिक्षा 3 लाख 30 हजार रूपयेला खरेदी केली आहे. ही रिक्षा चार्जिंग सुरू झाल्यानंतर माझे लाईट बील महिन्याला साधारण 2 हजारने वाढले. माझा रोजचा 800 ते 900 रुपयांचा धंदा होतो. एकदा पूर्ण चार्जिंग केले की 100 किलोमीटर रिक्षा फिरते. माझे या रिक्षाचे पैसे साधारण एका वर्षात फिटले. त्यामुळे ही रिक्षा व्यवसायिकांसाठी खूप फायदेशीर आहे.
सुशांत बावडेकर, ईव्ही रिक्षा चालक
- रिक्षा व्यवसायिकांनी इलेक्ट्रिक रिक्षांकडे वळवण्याची गरज
23 ऑक्टोबर 2017 रोजी जिह्यात पहिली इलेक्ट्रिक रिक्षाची नोंदणी झाली. त्यानंतर 2018, 2019, 2020 या तीन वर्षात प्रत्येकी एक इव्ही रिक्षाची नेंदणी झाली. 2023 साली 14 आणि 2024 मध्ये 16 रिक्षांची नेंदणी झाली आहे. म्हणजेच गेल्या सात वर्षात केवळ 34 रिक्षांची नेंदणी झाली आहे. ही रिक्षा व्यवसायिकांसाठी फायदेशीर असताना देखील त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
चंद्रकांत माने, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर








