कोल्हापूर :
शहरी ई गव्हर्नन्स इंडेक्स 2025 (सिटी ई गर्व्हनन्स इंडेक्स) मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये ई–गव्हर्नंस यंत्रणेचा वापराबाबत अभ्यास केला जातो. यामध्ये सेवा, पारदर्शकता, उपलब्धता या तीन निकषांच्या आधारे गुण दिले जातात. या निकषावर पहिला क्रमांक पुणे महापालिका, आणि कोल्हापूर महापालिकेने द्वितीय क्रमांक तर पिंपरी चिंचवड महापालिकेने तिसरा क्रमांक मिळविला.
पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशने राज्यातील सर्व 28 महानगरपालिकांचे संकेतस्थळ, त्यावरून दिले जाणाऱ्या सेवा, संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली अद्ययावत माहिती, मोबाईल अॅप, मोबाईल अॅपवरून दिल्या जाणाऱ्या सेवा व माहिती, सामाजिक माध्यमांचा अभ्यास केला. नागरिकांना चांगल्या ई–गव्हर्नंस प्रणालीद्वारे ऑनलाईन सेवा देण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ही सेवा ऑनलाईन देऊन महापालिकेने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली व उप–आयुक्त साधना पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने हा द्वितीय क्रमांक मिळविल्याचे महापालिका प्रशासनाने पत्रकाव्दारे दिली.
कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ httpsë//web.kolhapurcorporation.gov.in/ हे असून अधिकृत मोबाईल अॅप myKMC हे गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. या संकेतस्थळ तसेच मोबाईल अॅपवरून घरफाळा भरणे, पाणीपट्टी भरणे, जन्म/मृत्यू नोंदणी दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, नवीन नळ जोडणीसाठी अर्ज करणे, पाणीपट्टी व घरफाळा ना–हरकत प्रमाणपत्र, विवाह नोंदणी करणे, रुग्णालय नोंदणी व नूतनीकरण करणे, व्यावसायिक परवाना नोंदणी व नूतनीकरण करणे, अग्निशमन विभागाकडून आवश्यक ना–हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, तसेच विविध सेवांचे ऑनलाइन पेमेंट करणे, व इतर विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच इतर नवीन सेवा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांसाठी जास्तीत जास्त सेवा ई–गव्हर्नन्सच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे उप–आयुक्त साधना पाटील यांनी सांगितले आहे.








