कोल्हापूर :
राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट निवडणुक निर्णय अधिकारी पुरस्कारात कोल्हापुरने बाजी मारली आहे. पुणे विभागात लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना तर विधानसभा निवडणुकीचा करवीर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुर्नवसन अधिकारी वर्षा शिंगण यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यातील नाशिक, पुणे, कोकण, औरंगाबाद, अमरावती, नागपुर अशा सहा विभागात राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट निवडणुक निर्णय अधिकारी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सहा विभागातील पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांची यादी शासनाकडुन नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये पुणे विभागातंर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरने बाजी मारली आहे. लोकसभा आणि विधानसभा असे दोन्ही पुरस्कार कोल्हापुरला मिळाले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणुक अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, तहसीलदार, अधिनस्त निवडणुक प्रक्रीयेत योगदान देणारे कर्मचारी यांच्या सक्रीय सहभागामुळेच कोल्हापूराला हे दोन्ही पुरस्कार मिळाल्याची भावना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुर्नवसन अधिकारी वर्षा शिंगण यांनी व्यक्त केली आहे.







