कोल्हापूर :
गोवा राज्यात गांजाची विक्रीसाठी घेवून जात असलेल्या सातारा जिह्यातील तिघा गांजा तस्कारांना अटक करीत ठोकल्या बेड्या. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे. फैयाज अली मोकाशी (वय 37, रा. शिवाजी चौक, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा), सोहेल सलीम मोमीन (वय 33, रा. मोमीन मोहल्ला, उंब्रज, जि. सातारा), समीर उर्फ तौसिफ रमजान शेख (वय 21, रा. रहीमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी त्याची नावे आहेत. त्याच्याकडून 91 किलो गांजा, एक मोपेड, तीन मोबाईल हँन्डसेट असा 23 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितानविरोधात एनडीपीएस कायद्यातंर्गत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंमली पदार्थाचा साठा आणि त्याची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून, त्याच्याविरोधी कारवाई करण्याबाबतचा आदेश दिला आहे. त्यावऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांच्या दोन पथकाद्वारे तपास सूरु केला होता.
दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार फैयाज मोकाशी हा उचगांव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) मार्गे गोवा येथे गांजा विक्री करण्यासाठी मोपेडवरुन जाणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यावऊन पुणे–बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील उचगांव ब्रिजजवळ सापळा लावून मोपेडसह त्याला पकडले. त्याच्या मोपेडवरील पोत्याची तपासणी केली असता, त्यामध्ये 10 किलो गांजा मिळून आला. मोकाशी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे नोंद आहेत.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सोहेल मोमीन याच्याकडून आणला असून, तो गांजा पणजी (राज्य गोवा) येथील सॅम नावाच्या (पुर्ण नांव माहिती नाही) व्यक्तीला विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याचे सांगितले. त्यावऊन सोहेल मोमीनचा शोध घेवून त्यालाही अटक केली. त्याच्याकडे गुन्हेगार फैयाज मोकाशीला विक्री करण्यासाठी दिलेला गांजा कोठून आणला. याबाबत विचारपूस केली. त्यावेळी त्याने समीर शेख याच्याकडून आणल्याचे सांगितल्याने, त्यालाही अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने गांजाची बेकायदेशिरपणे राहत्या घरात साठा केल्याचे सांगतिले. त्यावऊन त्याच्या रहीमतपूर (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील राहत्या घरावर छापा टाकला. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या घरात तब्बल 81 किलो गांजा मिळून आला. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रविण पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, संतोष बरगे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, अशोक पोवार, परशुराम गुजरे, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, शिवानंद मठपती, नामदेव यादव, अनिल जाधव, यशवंत कुंभार व हंबीरराव अतिग्रे यांनी सहभाग घेतला.








