इतिहास अभ्यासक मोहन शेटे : लोकमान्य कल्चरल फौंडेशनतर्फे शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर व्याख्यानमालेचे आयोजन
बेळगाव : कोणत्याही अपयशाने खचून न जाता त्यातूनही यशाचा मार्ग मिळविता येऊ शकतो, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळतो. मिर्झाराजे जयसिंगसोबत झालेल्या तहानंतर शिवरायांना काहीशी माघार घ्यावी लागली. अनेक किल्ले तहामध्ये मिर्झाराजेला द्यावे लागले. परंतु हे अपयश पचवत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा झेंडा पुन्हा त्या किल्ल्यांवर फडकवला. हा संदेश आजच्या युवा पिढीला सर्वात महत्त्वाचा असून अपयश आले म्हणून कुठेही खचून जावू नका, असे विचार पुणे येथील इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे यांनी काढले. लोकमान्य कल्चरल फौंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या अखेरच्या सत्रात त्यांनी ‘शिवराज्याभिषेक आणि दक्षिण दिग्विजय’ या विषयावर व्याख्यान दिले.
तामिळनाडूत मराठमोळे किल्ले
शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम राबविली. दक्षिणेकडील कुतुबशहासोबत समन्वय साधत दरवर्षी एक लाख हून खंडरुपात तसेच चार हजार सैनिक महाराजांनी आपल्यासोबत घेतले. वल्लोरचा किल्ला खंदकामुळे जिंकता येत नव्हता. त्यामुळे शिवरायांनी बाजूला दोन डोंगरांवर साजरा-गोजरा असे दोन किल्ले बांधले. आजही ते किल्ले दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेची ओळख बनून राहिले आहेत. कर्नाटकाची भूमी स्वतंत्र करण्यात मराठ्यांचेच म्हणजे नागोजी जेधेंचे कर्तृत्व होते, असाही उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्यचे पीआरओ राजू नाईक यांनी केले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, सीईओ अभिजित दीक्षित, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सुनील मुतगेकर, सुनील तळवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
10 वर्षांत 348 किल्ल्यांवर फडकवला भगवा
स्वराज्याचे व्यवस्थापन व नियोजन कसे असावे, याचा अभ्यास सध्याच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावा. 1670 मध्ये स्वराज्यात केवळ 12 किल्ले होते. परंतु अवघ्या 10 वर्षांत 1680 मध्ये स्वराज्यातील किल्ल्यांची संख्या 360 वर पोहोचली. केवळ दहा वर्षांत 348 किल्ले शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रेरणेतून उभारले असतील याचा अभ्यास जरी विद्यार्थ्यांनी केला तर त्यांना व्यवस्थापनाचे इतर धडे घेण्याची गरज भासणार नाही, असे मोहन शेटे यांनी सांगितले.









