वार्ताहर/उचगाव
येथील उचगाव अॅप्रोच रोडवरील आनंदी कॉम्प्लेक्समधील दोन गाळ्यांमध्ये मंगळवारी रात्री अंदाजे एक ते तीनच्या सुमाराला दुकानांची शटर तोडून रोख रकमेसह जवळपास 50 हजार ऊपये व इतर साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. महिन्याभरातील चोरीचा हा सहावा प्रकार असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील कॉम्प्लेक्समध्ये दुकानदारांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. यामध्ये ज्योतिर्लिंग ट्रेडर्स हे पशुखाद्य व जनरल मर्चंट दुकान आहे. या दुकानाचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला. तत्पूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ नये यासाठी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली.
याची किंमत 25000 हजार ऊपये आहे. तसेच त्याची मुख्य मशीनही फोडून मागील बाजूला असलेल्या शेतवडीत फेकून दिली होती. टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली रक्कम व फॅन अशा वस्तूंची चोरी करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग ट्रेडर्स हे नेहाल रणजीत जाधव यांचे दुकान होते. तर शेजारीच असलेले आबाजी विलास देसाई यांच्या गळ्यातील हार्डवेअर दुकानाचेही शटर तोडूनरोख रक्कम व इतर साहित्याची चोरी करण्यात आली आहे. यापूर्वीही घरासमोर लावलेल्या दोन दुचाकींची चोरी झाली होती. याशिवाय गेल्या आठ दिवसांपूर्वीच एका सराफी दुकानांमध्ये दोन महिलांनी दागिने घेण्याच्या बहाण्याने येऊन दागिने बॅगेत घालून लंपास केले होते.
मात्र काही वेळातच चोरी उघडकीला आली होती. तसेच विद्युत मोटारींची चोरी झाली होती. यामुळे एक महिन्यात सहा ठिकाणी चोऱ्या झाल्याने गावातील नागरिक हैराण झाले आहेत. उचगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक (बसस्थानक) येथे पोलिसांचा रात्रंदिवस पहारा आहे. मात्र तरीहे चोरीचे प्रकार कसे काय घडत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरीची नोंद काकती पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच उचगाव ग्राम पंचायतचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य गजानन नाईक, हनुमंत बुवा यांनीही या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.









