वृत्तसंस्था/ राऊरकेला, ओडिशा
हिरो हॉकी इंडिया लीगमधील सामन्यात यूपी रुद्राजने टीम गोनासिकावर 2-0 अशी मात केली. टॅन्गॉय कोसीन्स (37) व केन रसेल (47) यांनी रुद्राजचे गोल नोंदवले. या सामन्याच्या पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दोन्ही संघांनी काही वेळा सर्कलपर्यंत धडक मारली. पण त्यांना फिनिशिंग टच देता आला नाही. दुसऱ्या सत्रात रुद्र्राजचे चार पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पहिल्यावर रसेलचा फटका चुकला. गोनासिकाचा गोलरक्षक ऑलिव्हर पेनने त्यांचे अनेक प्रयत्न वाया घालविले. 37 व्या मिनिटाला रुद्राजचा पहिला गोल टॅन्गॉय कोसीन्सने नोंदवत आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नरवर हा गोल झाला. पुढच्याच मिनिटाला गोनासिकाला बरोबरी साधण्यची संधी मिळाली होती. पण फ्लोरिसने गोललाईनवर अप्रतिम बचाव करीत त्यांचा हा प्रयत्न फोल ठरविला.
उत्तरार्धात रुद्राजला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. त्यातील दुसऱ्यावर 40 व्या मिनिटाला रसेलने गोल नोंदवत 2-0 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम राखत रुद्राजने विजय साकार केला.









