वृत्तसंस्था/ इम्फाळ
हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये भाजप आणि जेडीयूच्या पाठिंब्यावरून बुधवारी जोरदार राजकीय नाट्या रंगले. जेडीयूच्या राज्य युनिटने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या भाजप नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे पत्र जारी केले. जेडीयूचे प्रदेशाध्यक्षांनी राज्यपालांना पत्र लिहून भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्षांचे पत्र समोर आल्यानंतर जेडीयूने त्यांच्यावर कारवाई करत पदावरून हटवले आहे. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष के बिरेन सिंह यांनी पाठिंबा काढून घेतल्याचे नमूद केले होते. मात्र, या निर्णयाचा कोणताही परिणाम मणिपूर सरकारवर होणार नव्हता. राज्याच्या 60 सदस्यांच्या विधानसभेत भाजपकडे 37 जागा असून त्यांना नागा पीपल्स फ्रंटच्या पाच आमदारांचा आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. जेडीयूचे पाच आमदार यापूर्वीच भाजपमध्ये सामील झाले असून सध्या जेडीयूचा एकमेव आमदार पक्षाचे नेतृत्त्व करत आहे.









