सभामंडप उत्स्फूर्त भरगच्च : म. गांधीजींच्या वेशातील विद्यार्थीही सहभागी
बेळगाव : सीपीएड् मैदानावरील जय बापू, जय भीम, जय संविधान मेळाव्याला राज्यभरातील विविध विधानसभा मतदारसंघांतून मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील विद्यार्थीही मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यामुळे सभामंडप खचाखच भरला होता. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, मेळावा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनीही सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगावात पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याने बेळगावात डिसेंबर 2024 मध्ये गांधी भारत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
27 डिसेंबर रोजी जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने सदर कार्यक्रम रद्द झाला होता. त्यानंतर 21 जानेवारी रोजी पुन्हा या कार्यक्रमाचे काँग्रेस व राज्य सरकारकडून आयोजन करण्यात आले. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. सुवर्णसौध आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासह सीपीएड् मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शहरात सर्वत्र स्वागत कमानी व जाहिरात फलक लावण्यात आले.
कार्यक्रमाला राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित रहावेत यासाठी स्थानिक आमदारांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच बसेस, खासगी टेम्पो व इतर वाहनांतून मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली. सभामंडपात म. गांधीजींच्या वेशातील विद्यार्थीही दाखल झाले होते. ते सर्वांचे आकर्षण ठरत होते. क्लब रोडवर वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी सरदार्स मैदान, त्याचबरोबर अन्य ठिकाणीही पार्किंगची सोय करण्यात आली होती. दुपारी 1.51 मिनिटांनी मेळाव्याला सुरुवात झाली. एकंदरीत काँग्रेसच्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी…
सभामंडपात प्रवेश करणाऱ्या सर्वांची प्रवेशद्वारावरच मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जात होती. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश व त्यांचे सहकारी सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. बंदोबस्तासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून पोलीस फौजफाटा मागविण्यात आला होता.









