वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांची सूचना : बिम्समध्ये अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटल आवारात बांधण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार काही डॉक्टरांनी अर्ज केले आहेत. त्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची ओपीडी सेवा सुरू करण्यात यावी, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी बिम्सच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी बैठकीत केली. बिम्स हॉस्पिटलचे तातडीने लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून केवळ मनुष्यबळाअभावी हॉस्पिटलचे कामकाज सुरू झालेले नाही. त्यामुळे बिम्सकडून संबंधित विभागांसाठी डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार काही डॉक्टरांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या डॉक्टरांची नियुक्ती झाली आहे. अद्याप काही विभागांसाठी अर्ज आले नाहीत. उपलब्ध असलेल्या डॉक्टरांकडून ओपीडी सुरू करण्यात यावी, तसेच पुन्हा अर्ज मागविण्यात यावेत, अशी सूचना यावेळी मंत्री पाटील यांनी केली.यावेळी बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इराण्णा पल्लेद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.









