ऊस वजनात पारदर्शकतेसाठी सरकारचा निर्णय : काटामारीला लगाम
बेळगाव : ऊस उत्पादकांची होणारी काटामारी थांबविण्यासाठी जिल्ह्यात तीन डिजिटल वजनकाटे बसविले जाणार आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. साखर कारखान्यांकडून ऊस वजनात काटामारी होत असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. हे थांबविण्यासाठी जिल्ह्यात डिजिटल वजनकाटे बसविले जाणार आहे. ऊस उत्पादकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा ऊस उत्पादनात आघाडीवर आहे. साधारण 17 हून अधिक साखर कारखान्यातून उसाचे गाळप होते. मात्र काही साखर कारखान्यांच्या वजनामध्ये घट येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी काटामारीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांचा ऊस ज्यावेळी वजन करण्यासाठी वजन काट्यावर ठेवला जातो. त्यावेळी दोन ते अडीच टनाची घट येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. ही काटामारी थांबविण्यासाठी डिजिटल वजनकाट्यांची मदत घेतली जाणार आहे. राज्य सरकारने 2025-26 या वर्षासाठी प्रतिटन 4440 रुपये दर निश्चित केला आहे. मात्र काही कारखान्यांकडून कमी दर दिला जात आहे. त्याबरोबर उसाच्या वजनातही काटामारी केली जात आहे. ऊस वजनात पारदर्शकता यावी, यासाठी डिजिटल वजन काटे बसविले जाणार आहेत. यंदा मजुरांअभावी गळती हंगाम लांबणीवर पडला आहे. ऊस तोडणी मजूर वेळेत न आल्याने तोडणीला उशिराने प्रारंभ झाला आहे.









