दरात वाढ : 65 ते 75 रूपये डझन, उत्पादनात घट
बेळगाव : वाढत्या थंडीमुळे केळी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे केळ्याचे भाव वाढले आहेत. 50 ते 60 रुपये डझन मिळणारी केळी 65 ते 75 रुपये झाली आहेत. विशेषत: राज्यातील चिक्कमंगळूर, शिमोगा, म्हैसूर, हसन, दक्षिण कन्नड, उत्तर कर्नाटकातील काही भागांमध्ये केळ्याची लागवड केली आहे. मात्र सध्या त्या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्यामुळे केळ्यांचा रंगदेखील काळा पडू लागला आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातही केळ्यांची चढ्यादराने विक्री होऊ लागली आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमध्ये देखील वातावरण बदलामुळे केळी उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्यात केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र बदलत्या हवामानामुळे केळी उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. हिवाळ्यातील बदलत्या वातावरणाचा परिणाम केळी बागायतीवर झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी केळ्यांचे दर वाढू लागले आहेत.









