तीन महिन्यांतील तिसरा प्रकार उघडकीस : चार लाखांना विक्री : चौघांना अटक; दोघे फरारी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात लहान मुलांच्या विक्रीचे प्रकार सुरूच आहेत. हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूर येथील सात वर्षीय मुलाची विक्री करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली असून गेल्या तीन महिन्यांत घडलेली ही तिसरी घटना आहे. सावत्र बापानेच मध्यस्थ महिलांच्या साहाय्याने 4 लाख रुपयांना मुलाची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सावत्र बापासह चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. सदाशिव शिवबसप्पा मगदूम (वय 32) रा. सुलतानपूर, ता. हुक्केरी, लक्ष्मी बाबू गोलभावी (वय 38) मूळची राहणार भडगाव, ता. गडहिंग्लज, सध्या रा. सुलतानपूर, संगीता विष्णू सावंत (वय 40) रा. नागाळा पार्क, कोल्हापूर, सध्या रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर, अनसुया गिरीमल्लाप्पा दोडमनी (वय 50) रा. केसरोळी, ता. हल्याळ, जि. कारवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी पत्रकारांना यासंबंधीची माहिती दिली आहे. कोल्हापूर व कारवार जिल्ह्यातील मध्यस्थांनी बेळगाव शहरात 4 लाख रुपयांना सात वर्षीय मुलाची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील अन्य दोघांचा शोध सुरू आहे. गेल्या महिन्यात मार्केट पोलीस स्थानकातही मुलाच्या विक्री प्रकरणाची नोंद झाली होती. हा व्यवहारही कारवार जिल्ह्यातील रामनगर येथे झाला होता. चार महिन्यांपूर्वी सुलतानपूर येथील सदाशिव मगदूम याने बॅतनाळ, ता. हानगल, जि. हावेरी येथील संगीता गुडाप्पा कम्मार (वय 30) हिच्याशी लग्न केले होते. या दोघा जणांचेही हे दुसरे लग्न. पहिल्या पत्नीपासून सदाशिवने घटस्फोट घेतला आहे तर आपल्या पहिल्या पतीपासून संगीतानेही घटस्फोट घेतला आहे.
पहिल्या लग्नातून या दोघा जणांनाही अपत्ये आहेत. लग्नानंतर नांदण्यासाठी संगीता सुलतानपूरला आली. सदाशिव व संगीताच्या पहिल्या लग्नातून झालेल्या अपत्यांमध्ये पटेना. त्यामुळेच सदाशिवने सात वर्षीय मुलाच्या विक्रीची योजना आखली. सदाशिव व संगीता यांच्या लग्नात लक्ष्मी गोलभावी ही मध्यस्थ होती. तुम्ही दोघे दाम्पत्य आरामात रहा, आपण मुलाला घेऊन जाऊन सांभाळतो, असे सांगत लक्ष्मीने संगीताच्या मुलाला आपल्यासोबत नेले व आपली मैत्रीण संगीता विष्णू सावंत हिच्याशी हातमिळवणी करून या मुलाला हल्याळ तालुक्यातील केसरोळीला नेऊन अनसुया दोडमनी हिच्या घरात सोडण्यात आले. अनसुयाने बेळगाव येथील दिलशाद सिकंदर तहसीलदार हिला 4 लाख रुपयांना या मुलाची विक्री केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
दिलशादच्या मुलीला दोन मुली झाल्या आहेत. तिला मुलगा नाही. त्यामुळे 4 लाखाला सात वर्षीय मुलाला खरेदी केली होती. या मुलाची विक्री करताना लक्ष्मी व संगीता यांनी अनाथ मुलगा असल्याचे सांगून व्यवहार ठरवला होता. त्याचवेळी दिलशादने या व्यवहारासंबंधी पोलीस स्थानकात येऊन लिहून द्या, सांभाळ करण्यासाठी अनाथ मुलाला आपल्याकडे सोपवत असल्याचे लेखी लिहून द्या, असा तगादा लावला. त्यामुळे संशयित आरोपींनी आपला फोन बंद ठेवला. याचवेळेला मुलाची आई संगीता कम्मार हिनेही आपल्या मुलाविषयी चौकशी केली. तिला व्यवस्थित उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे संशयाने तिने हुक्केरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर, साहाय्यक पोलीस निरीक्षक सनदी, एन. बी. जमादार, रवी ढंग, सी. डी. पाटील, एम. एस. कब्बूर, बी. व्ही. नावी, एस. आर. अंतरगट्टी, ए. एल. नायक, आर. यु. हणमण्णावर, के. व्ही. करेन्नावर आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने बैलहोंगल तालुक्यातील एका गावात सात वर्षीय मुलाचा शोध घेऊन त्याला जिल्हा बाल संरक्षण विभागाकडे सोपविले आहे. त्या मुलाच्या आईलाही यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
मुलाच्या विक्रीच्या पैशांचे वाटप
गेल्या तीन महिन्यांतील मुलांच्या विक्री प्रकरणाची ही तिसरी घटना आहे. या प्रकरणी लोंढा येथील भरत रघुनाथ पुजारी व बेळगाव येथील दिलशाद सिकंदर तहसीलदार यांच्यावरही एफआयआर दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुलाच्या विक्रीनंतर आलेले 4 लाख रुपये आरोपींनी वाटून घेतले आहेत. मुलाचा सावत्र बाप असणाऱ्या सदाशिव मगदूमनेही 1 लाख 40 हजार रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे, असे पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.









