सिग्नल बंदमुळे समस्या कायम : अपघाताचा धोका, पादचाऱ्यांतून संताप
बेळगाव : मागील दोन-तीन महिन्यांपासून यंदे खूट येथील सिग्नल बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहनधारकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदे खूट येथील सिग्नलचा खांब मोडकळीस आला आहे. त्यानंतर खांब उभा करून त्यावर सिग्नल बसविण्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल नसल्याने भरधाव वाहने ये-जा करीत आहेत. यातूनच लहान वाहने आणि पादचारी वाट काढत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वर्तविला जात आहे.
शहराचे प्रवेशद्वार असल्याने पश्चिम भागातील नागरिकांसह कोकण आणि गोवा येथील ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र येथील सिग्नलच बंद असल्याने मनमानीप्रमाणे वाहने चालविली जात आहेत. वाहनधारकांना शिस्त लावण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाचे नवीन सिग्नल उभे करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या निर्माण होऊ लागली आहे. सिग्नल उभारण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्नही पडू लागला आहे. या मार्गावरून अवजड वाहनांसह लहान-सहान वाहनांची संख्याही मोठी आहे. मात्र सिग्नलअभावी हा मार्ग धोकादायक बनू लागला आहे.









