वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचे आशियाई चॅम्पियनशिपमधील माजी कांस्यविजेते बॅडमिंटनपटू अनुप श्रीधर यांना एकेरीचा प्रशिक्षक म्हणून सिंगापूर बॅडमिंटन संघटनेने (एसबीए) नियुक्त केले आहे. मात्र दक्षिण कोरियाचे किम जि-ह्युन हे पुरुष व महिला संघांचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून यापुढेही कायम राहतील, असे एसबीएने सोमवारी जाहीर केले.
‘व्हिसा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यकाल केव्हा सुरू होणार हे निश्चितपणे सांगता येईल. पण ते लवकरात लवकर आमच्या प्रशिक्षण पथकात सामील व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यांचा कार्यकाल अल्प कालावधीचा नसेल एवढे मात्र मी सांगू शकतो,’ असे एसबीएचे उपाध्यक्ष प्रो. डेव्हिड टॅन यांनी सांगितले. 41 वर्षीय श्रीधर यांनी तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत कांस्यपदकही पटकावले आहे. ते सिंगापूर संघाचे मुख्य प्रशिक्षक होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्यावरही टॅन यांनी संताप व्यक्त केला.
‘एसबीएने श्रीधर यांची एकेरीचे प्रशिक्षक म्हणूनच निवड केली आहे. पण ते एकेरीचे मुख्य प्रशिक्षक असल्याचे चुकीचे वृत्त भारतीय मीडियात प्रसिद्ध झाले आहे. इंडिया ओपन स्पर्धेत अॅक्सेलसेन व लोह कीन यू यांच्यातील उपांत्यपूर्व लढतीवेळी समालोचकांनीही तसेच सांगितले होते. पण ते चुकीचे आहे,’ असे टॅन यांनी स्पष्ट केले.
श्रीधर हे 2006 ते 2008 या कालावधीत भारताच्या थॉमस चषक संघाचे कर्णधार होते. त्यांनी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 2005 ते 2008 या कालावधीत ते भारताचे एकेरीतील टॉपचे खेळाडू होते. त्यांनी पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन यासारख्या नामवंत खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे.









