इंग्लंडचा 57 धावांनी पराभव, बेथ मुनी ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / सिडनी
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंड महिला संघावर 57 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. या सामन्यात 51 चेंडूत 75 धावा झळकविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 बाद 198 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 199 धावांचे आव्हान दिले. पण इंग्लंडचा डाव 16 षटकात 141 धावांत आटोपल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या बेथ मुनीने 51 चेंडूत 11 चौकारांसह 75 धावा झळकविताना सलामीच्या व्हॉलसमवेत 21 चेंडूत 40 धावांची भागिदारी केली. व्हॉलने 11 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. मुनीने लिचफिल्ड समवेत दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भग घातली. लिचफिल्डने 20 चेंडूत 1 षटकार आणि2 चौकारासह 25 धावा जमविल्या. सदरलँड केवळ 3 धावांवर तर इलेसी पेरी 7 धावांवर बाद झाल्या. कर्णधार मॅकग्राने 9 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 26 धावा जमविल्या. हॅरिसने 1 षटकार आणि 1चौकारांसह 8 चेंडूत 14 तर वेअरहॅमने 10 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला अवांतर 15 धावा मिळाल्या. बेथ मुनी सहाव्या गड्याच्या रुपात बाद झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 3 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे बेल आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 2 तर केम्प आणि डीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या सहा षटकात 47 धावा जमविताना 1 गडी गमविला. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 40 चेंडूत, शतक 66 चेंडूत आणि दीड शतक 94 चेंडूत नोंदविले गेले. मुनीने 37 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले. 10 षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने 1 बाद 90 धावा जमविल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात डंक्लेने 30 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 59, नॅट सिव्हेर ब्रंटने 12 चेंडूत 5 चौकारांसह 20, कर्णधार नाईटने 20 चेंडूत 2 चौकारांसह 18, अॅमी जोन्सने 11 चेंडूत 1 चौकारांसह 12, केम्पने 6 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 11 आणि इक्लेस्टोनने 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा केल्या. इंग्लंडची सलामीची जोडी बाऊचर आणि हॉज खाते उघडण्यापूर्वीच बाद झाली. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 62 धावा जमवित 3 गडी गमविले. इंग्लंडचे अर्धशतक 26 चेंडूत, शतक 63 चेंडूत नोंदविले गेले. डंक्लेने 24 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 10 षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 3 बाद 96 अशी होती. ऑस्ट्रेलियातर्फे वेअरहॅमने 25 धावांत 3, किंगने 14 धावांत 2, शूट, गार्थ, सदरलँड आणि मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकात 7 बाद 198 (मुनी 75, व्हॉल 21, लिचफिल्ड 25, मॅकग्रा 26, हॅरिस 14, वेअरहॅम नाबाद 11, अवांतर 15, इक्लेस्टोन आणि बेल प्रत्येकी 2 बळी, केम्प, डीन, प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 16 षटकात सर्वबाद 141 (डंक्ले 59, नॅट सिव्हेर ब्रंट 20, नाईट 18, जोन्स 12, केम्प नाबाद 11, इक्लेस्टोन 13, अवांतर 6, वेअरहॅम 3-25, किंग 2-14, शूट, गार्थ, सदरलँड, मॅकग्रा प्रत्येकी 1 बळी)









