वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील बारामुल्ला जिह्यात झालेल्या चकमकीत एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले आहे. सोपोर भागातील जालोरा गावात रविवारपासून काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली होती. रविवारी सायंकाळी दहतशवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवान गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतल्याचे लष्करी सूत्रांकडून सोमवारी सांगण्यात आले.
सुरक्षा दलाने सोपोरमधील जालोरा गावात घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त केला होता. हे गाव सोपोरपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली होती. रविवारी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर जालोरच्या गुर्जरपती भागात सुरू असलेली कारवाई थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.









