विषप्रयोग करत प्रियकराचा घेतला होता जीव : दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या एका स्थानिक न्यायालयाने 24 वर्षीय ग्रीष्माला प्रियकर शेरोन राजच्या हत्येसाठी मृत्युदंड ठोठावला आहे. ग्रीष्माने 14 ऑक्टोबर 2022 रोजी औषधात विषारी रसायन मिसळत त्याचा जीव घेतला होता. शिक्षा सुनावताना न्यायालयात ग्रीष्मा शांत उभी होती, तर न्यायालयात उपस्थित शेरोनची आईवडिल रडत होते. तर ग्रीष्माचे काका निर्मल कुमार यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हा गुन्हा क्रूर स्वरुपाचा होता आणि दोषीबद्दल कुठल्याही प्रकारची नरमाई बाळगली जाऊ नये अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
तर ग्रीष्माच्या आईची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विषप्रयोगानंतर 11 दिवसांपर्यंत मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेरोनचा 25 ऑक्टोबर 2022 रोजी मृत्यू झाला होता. ग्रीष्मा आणि शेरोन यांच्यातील नाते प्रारंभी मैत्रीच्या स्वरुपात सुरू झाले होते. परंतु ग्रीष्माचा अन्य युवकासोबत साखरपुडा झाल्यावर हे नाते बिघडले होते. ग्रीष्माने शेरोनसोबतचे नाते समाप्त करण्याचा प्रयत्न केला होता. कथित स्वरुपात तिला एका ज्योतिष्याने तिचा पहिल्या पतीचा मृत्यू होईल, ज्यानंतर ती शांततेत दुसरा विवाह करू शकेल असे सांगितले होते.
ग्रीष्माला या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास होता, ज्याला शेरोनने आव्हान देत चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न केला होता. शेरोनने प्रतिकात्मक स्वरुपात वेट्टुकाडू चर्चमध्ये ग्रीष्मासोबत विवाह केला होता, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.
शेरोनच्या हत्येचा तपास प्रारंभी पोलिसांनी योग्यप्रकारे केला नव्हता, ही हत्या पूर्वनियोजित होती असा दावा शेरोनच्या कुटुंबीयांनी केला होता. तर ग्रीष्माने पोलीस कोठडीत कीटाणूनाशक प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावर या प्रकरणाने नाट्यामय वळण घेतले होते. खटल्यादरम्यान पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यानंतरही ग्रीष्माने स्वत:वरील आरोप नाकारले होते. याप्र्रकरणाने व्यापक स्वरुपात लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. शेरोन खासगी क्षणांची छायाचित्रे अन् व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला शेअर करेल या भीतीने ग्रीष्माने ही हत्या केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे मानणे हेते.









