प्रकल्पाला शेतजमिनींपासून दूर ठेवा : थलपति विजय
वृत्तसंस्था/ चेन्नई
अभिनेता आणि तमिलगा वेत्री कषगम (टीव्हीके) पक्षाचा प्रमुख विजयने प्रस्तावित परंदूर विमानतळ प्रकल्पामुळे प्रभावित होणारे शेतकरी आणि लोकांची भेट घेतली आहे. विजय यांनी प्रकल्पाला विरोध करत शेतकऱ्यांना समर्थन जाहीर केले आहे. आमचा विरोध विकास किंवा विमानतळाला नाही. परंतु या सुपिक जमिनींपासून हा प्रकल्प दूर असावा असे विजय यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे.
90 टक्के कृषी भूमी, जलाशयांना नष्ट करून विमानतळ आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. द्रमुक सरकार जनविरोधी आहे. द्रमुक सरकारने टंगस्टन खाणीला विरोध केला. मग परंदूर विमानतळाबाबत हीच भूमिका का स्वीकारली नाही? परंदूर विमानतळ प्रकल्पात द्रमुकला काही लाभ मिळणार असल्याचे लोक ओळखून आहेत. विरोधी पक्षात असताना द्रमुक शेतकऱ्यांना समर्थन देत होता, मग सत्तेवर आल्यानंतर द्रमुकची भूमिका कशामुळे बदलली असा प्रश्न विजय यांनी उपस्थित केला.
तामिळनाडूच्या काचीपुरममध्ये देखील नव्या विमानतळाला जोरदार विरोध होत आहे. विमानतळाच्या विरोधात 13 गावांमधील ग्रामस्थ एकवटले आहेत. दोन ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी नव्या विमानतळाची घोषणा केली होती. 20 हजार कोटी रुपयांच्या निधीतून परंदूरमध्ये विमानतळ निर्माण केले जाणार असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले होते.
परंदूर विमानतळाच्या प्रस्तावाच्य विरोधात परंदूर संघर्ष समितीच्या बॅनर अंतर्गत शेतकरी 910 दिवसांपासून निदर्शने करत आहेत. आता या शेतकऱ्यांना विजय यांचा पक्ष टीव्हीकेचेही समर्थन मिळाले आहे.









