उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आवाहन
बेळगाव : देशाचे स्वातंत्र्य, संविधान, एकता, गांधीतत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांच्या संरक्षणासाठी बेळगावात जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गांधी तत्त्वावर विश्वास असणारे कोणीही या मेळाव्यात भाग घेऊ शकतात, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. रविवारी सीपीएड मैदानाला भेट देऊन मंगळवार दि. 21 रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, या ऐतिहासिक मेळाव्यासाठी क्षणगणना सुरू झाली आहे. एआयसीसीच्या नेत्यांनीच या मेळाव्याला जय बापू, जय भीम, जय संविधान मेळावा असे नाव ठेवले आहे. संविधान, महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तत्त्वे पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावी म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा केवळ काँग्रेसचा कार्यक्रम नाही तर देशाचा कार्यक्रम आहे. गांधीजी, डॉ. आंबेडकर व संविधानावर विश्वास असणारे कोणीही या कार्यक्रमात भाग घेऊ शकतात. ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार ठरू शकतात. महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली बेळगावात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस मेळाव्याच्या शतकमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे. याचवेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावर मल्लिकार्जुन खर्गे आहेत. या मेळाव्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत, असे शिवकुमार यांनी सांगितले. सुवर्ण विधानसौधच्या आवारात महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. गांधी भारत कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. एच. के. पाटील, एम. विराप्पा मोईली, बी. एल. शंकर, के. एच. मुनियप्पा, रेहमान खान आदी नेत्यांच्या नेतृत्वाखालील समिती पुढील कार्यक्रम कसे असणार आहेत, याची रूपरेषा ठरवणार आहे. शाळा-कॉलेजमध्येही असे कार्यक्रम आयोजित करण्यासंबंधी सूचना करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद मुख्यमंत्री करणार आहेत. वर्षभर कार्यक्रम चालणार आहेत.
गांधी भारतच्या पार्श्वभूमीवर बेळगावसाठी काही तरी विशेष भेट देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निश्चितच देणार आहे. काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशवासीय बेळगावकडे पाहात आहेत. बेळगावची ही ओळख देशभरात कायम राहणार आहे, मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, गॅरंटी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा, मंत्री जमीर अहमद खान आदी नेत्यांनीही तयारीची पाहणी केली.
मुख्यमंत्री आज बेळगावात
मंगळवार दि. 21 रोजी सीपीएड मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी सायंकाळी बेळगावात दाखल होणार आहेत.









