बेळगाव : कॅम्प येथील इंडिपेंडेंट रस्ता शनिवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी गांधी स्मारक व ग्लोब थिएटर कॉर्नर येथे गतिरोधक तयार केले जात असून लोखंडी कमान बसविली जाणार असल्याने रस्ता रविवारीही बंद ठेवण्यात आला. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पर्यायी मार्गाने नागरिकांना हिंडलगापर्यंतचा प्रवास करावा लागला. कॅम्प परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये तसेच रहिवासी वसाहती असल्यामुळे अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी पालकांनी आंदोलन करून अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला.
अखेर कॅन्टोन्मेंटच्या बोर्ड मिटिंगमध्ये यासंदर्भात एक ठराव करून वाहतूक रोखली जावी, असा निर्णय घेण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्री तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डने वाहतूक रोखण्यासाठी सुरुवातीला जवानांची नियुक्ती केली. त्यानंतर लोखंडी कमानी बसविण्यात आल्या. रात्रीच्या वेळी लोखंडी कमान निदर्शनास न आल्याने अपघात होऊन लोखंडी कमानीचे नुकसान झाले. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात लोखंडी बॅरल ठेवण्यात आले होते. मागील चार दिवसांपासून गांधी स्मारक या ठिकाणी दुभाजक तयार करण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी ग्लोब थिएटर कॉर्नर येथेही दुभाजक केला असून लोखंडी कमान बसविण्यासाठीची तयारी सुरू होती.
चुकीच्या पद्धतीने दुभाजकाची निर्मिती
कोणताही विचार न करता गांधी स्मारक व ग्लोब थिएटर कॉर्नर येथे काँक्रिटचे गतिरोधक करण्यात आले आहेत. यावरून वाहतूक करताना वाहने अडकली जात आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने गतिरोधक करण्यात आल्याने नागरिकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट प्रशासन काय निर्णय घेते, हे पहावे लागणार आहे.









