महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा परिणाम : मजुरांचा तुटवडा
बेळगाव : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाल्याने ऊस तोडणीची लगबग पहावयास मिळत आहे. उसाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतले होते. त्यामुळे यंदा ऊसतोडणी लांबणीवर पडली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ऊसतोडणी कामगार बेळगाव जिल्ह्यातील विविध भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ऊस तोडणीची लगबग दिसत आहे. बेळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांच्या गळीप हंगामाला प्रारंभ झाला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून सीमाभागातील उसांची पळवापळवी सुरू झाली आहे. यंदा पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठावरील ऊस पिकांना फटका बसला आहे. तर इतर भागातील ऊस जोमाने आले आहेत. अशा उसांची तोडणी सुरू झाली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचाही परिणाम
उसाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रारंभी शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतले होते. दरम्यान 4000 रुपये प्रति टन दर द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे काही काळ ऊस तोडणीही लांबणीवर पडली होती. विशेषत: बेळगाव आणि सीमाभागात महाराष्ट्रातील परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद येथील ऊस तोडणी कामगार दाखल होतात. मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे ऊस तोडणी कामगार येण्यासह विलंब झाला आहे. त्यामुळे यंदा ऊस तोडणी लांबणीवर पडली आहे.
ऊस तोडणीसाठी मजुरांचा तुटवडा
ऊस तोडणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे बऱ्याचशा भागात ऊस उभा राहिलेला दिसत आहे. ऊस तोडणी मजुरांअभावी काही ठिकाणी शेतकऱ्यांवरच ऊस तोडणीची वेळ आली आहे. काही भागात ऊस तोडणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.









