स्वयंसेवी संस्थेकडून सर्वेक्षण : महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक
बेळगाव : सफाई कर्मचाऱ्यांमुळेच बेळगाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत होत आहे. त्यामुळे शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एका स्वयंसेवी संस्थेने स्वच्छ शहरांच्या केलेल्या सर्वेक्षणात बेळगाव शहराचा समावेश असल्याने मनपाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता (पर्यावरण) हनुमंत कलादगी यांनी रविवार दि. 19 रोजी सकाळी सफाई कामगारांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. गेल्या काही दिवसांपासून शहर स्वच्छतेवर महापालिकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कचरा योग्य वेळेत उचलण्यासह विल्हेवाट लावण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांना शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.
त्याला लोकांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुऊवातीच्या काळात कचऱ्याच्या वर्गीकरणावरून वादावादीच्या घटना घडल्या. मात्र, जनतेतूनही आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सफाई कर्मचाऱ्यांमुळेच बेळगाव स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होत आहे. कचऱ्याची उचल करताना सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अलीकडे सफाई कर्मचाऱ्यांसाठी इंदिरा कॅन्टीनमध्ये अल्पोपहार आणि एक अंडे दिले जात आहे. महापालिकेला सफाई कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत असल्याने हे शक्य होत आहे. त्याचबरोबर एका स्वयंसेवी संस्थेने स्वच्छ शहरांच्या केलेल्या सर्वेक्षणात बेळगाव शहराचाही समावेश असल्याने ही कौतुकाची बाब बनली आहे. याबाबत महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते (पर्यावरण) हनुमंत कलादगी यांनी रविवारी सकाळी सफाई कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या शहर स्वच्छतेच्या योगदानाबद्दल अभिनंदन करत कौतुक केले.









