वृत्तसंस्था/ चंदीगड
आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकरची आजी आणि मोठे मामा यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगड बायपास रोडवर एक स्कूटर आणि ब्रेझा कारची टक्कर झाली. यात मनू भाकर हिचे मोठे मामा युद्धवीर सिंग आणि आजी सावित्री देवी या दोघांना प्राण गमवावे लागले. मृत युद्धवीर (50) हे परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत होते. तर आजी सावित्री देवी (70) ही देखील एक खेळाडू होती. तिने राष्ट्रीय पातळीवरही पदके जिंकल्याची नोंद आहे.
ब्रेझा कार आणि दुचाकीच्या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युद्धवीर यांचे घर महेंद्रगड बायपासवर आहे. ते स्कूटरवरून ड्युटीवर जात होते. त्यांनी सावित्री देवींनाही आपल्यासोबत दुचाकीवर बसवले होते. सावित्रीदेवींना त्यांना धाकट्या भावाच्या घरी सोडायचे होते. याचदरम्यान महेंद्रगड रोडवरील कालियाना वळणाजवळ पोहोचले असता चुकीच्या बाजूने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला उलटली तर स्कूटर चालवणारे आई आणि मुलगा दोघेही ठार झाले.









