वृत्तसंस्था/ गुवाहाटी
वादग्रस्त भाष्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध शनिवारी गुवाहाटीच्या पानबाजार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. राहुल गांधी यांनी भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणारी विधाने केल्याचा आरोप आहे. ‘बीएनएस’च्या कलम 152 अंतर्गत नोंदवलेले हे एफआयआर अजामीनपात्र आहे. अर्थातच राहुल गांधी यांना या प्रकरणात अटक झाली तर त्यांना जामिनासाठी थेट न्यायालयात जावे लागेल. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे वकील मोनजित चेतिया यांनी हे एफआयआर दाखल केले आहे. ‘राहुल गांधी यांच्या विधानामुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेत्याने सार्वजनिक व्यासपीठावरून केलेले विधान हे साधे राजकीय भाष्य नाही.’ असे चेतिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.









