कोलकाता प्रकरणात आज शिक्षा सुनावणार
►वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार-हत्येप्रकरणी सियालदाह न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आज सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला. या कलमांनुसार, गुन्हेगाराला मिळू शकणारी कमाल शिक्षा फाशी किंवा जन्मठेपेची आहे. त्यामुळे न्यायालय संजय रॉयला कोणती शिक्षा जाहीर करते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
9 ऑगस्ट 2024 रोजी घडलेल्या गुह्याच्या 162 दिवसांनंतर न्यायाधीशांनी शनिवारी आपला निकाल सुनावला. गेल्यावर्षी 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आणि बलात्कारानंतर डॉक्टरची निर्घृण हत्या केल्याचा आरोप संजय रॉयवर होता. कोलकाता पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संजय रॉयला अटक केली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिसांनी केला होता, परंतु नंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या खटल्याची सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी सुरू झाली. या काळात 50 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. प्रत्यक्ष खटल्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 57 दिवसांनी सियालदाह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी हा निकाल दिला. संजय रॉय याला दोषी ठरवताना न्यायाधीशांनी ‘तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे.’ अशी कठोर टिप्पणी केली आहे. बलात्काराच्या या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. घटनेपासून सद्यस्थितीपर्यंतची एकंदर परिस्थिती पाहता संजय रॉयला फाशीची शिक्षा होण्याची शक्यताच दिसून येत आहे.









