वृत्तसंस्था/ अम्मान
काही काळापूर्वीपर्यंत भारतीय सैन्य स्वत:च्या रक्षणासाठी विदेशी तंत्रज्ञानांवर निर्भर होते. परंतु आता भारतीय सुरक्षा प्रणाली पूर्ण जगात चर्चेत आल्या असून याचे उत्कृष्ट उदाहरण भारताची स्वदेशी आकाश एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ही हवाई सुरक्षा यंत्रणा आर्मेनियाने खरेदी केली असून ती डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने मिळून विकसित केली आहे. आर्मेनियानंतर ओमान देखील आकाश एअर डिफेन्स सिस्टीम खरेदीसाठी उत्सुक आहे.
ओमान हा मध्यपूर्वेतील महत्त्वाचा देश असून तो स्वत:ची संरक्षणक्षमता वाढविण्यासाठी आकाश एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करू इच्छित आहे. ही स्वदेशी क्षेपणास्त्र यंत्रणा शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीम असून ती 20 किलोमीटरपर्यंतच्या व्हर्टिकल आणि 25 किलोमीटरपर्यंतच्या हॉरिझॉन्टल लक्ष्याची ओळख पटवून त्याला नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहे.
आकाश एअर डिफेन्स सिस्टीम एकाचवेळी 5 हवाई लक्ष्यांना नष्ट करू शवपे. याची तुलना एस400 सारख्या जगप्रसिद्ध प्रणालींशी केली जाऊ शकते. परंतु मारक पल्ला कमी असूनही याचा वेग अन् प्रभावशीलता अद्वितीय आहे. ओमानसाठी ही प्रणाली आदर्श ठरू शकते कारण याचा कमी मारक पल्ला छोट्या देशांसाठी उपयुक्त आहे. ओमानला स्वत:च्या हवाई सुरक्षा प्रणालींना मजबूत करण्याची गरज भासत आहे. खासकरून येमेनमधील स्थितीमुळे ओमानसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
स्वस्त अन् प्रभावी पर्याय
आकाश सिस्टीम ओमानसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. कारण हे महागडे तंत्रज्ञान म्हणजेच रशियाच्या एस-400 गरज संपुष्टात आणू शकते. याचबरोबर याच्या देखभालीसाठी ओमानला मोठ्या प्रमाणावर साधनसामग्रीची गरज भासणार नाही. याची अचूकता आणि प्रभावशीलता ओमानच्या सुरक्षेसाठी एक प्रभावी तोडगा ठरू शकते. आकाशचे तंत्रज्ञान पाहता याला भारताच्या आयर्न डोमच्या स्वरुपातही पाहिले जाऊ शकते.









