वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांना सीआरपीएफचे नवे महासंचालक म्हणून नियुक्त केले आहे. विभागीय आदेशानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे. हा आदेश विभागीय कार्मिक आणि प्रशिक्षणकडून जारी करण्यात आला. आसाम कॅडरचे 1991 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी जी.पी. सिंह यांना सीआरपीएफ महासंचालकपदी नियुक्त केले जात असल्याचे या आदेशात नमूद आहे.
ज्ञानेंद्र प्रताप सिंह यापूर्वी आसाम पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत होते. आता ते सीआरपीएफ प्रमुख म्हणून सेवा बजावणार आहेत. ते 31 जानेवारी 2027 रोजी निवृत्त होणार आहेत. ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी यापूर्वी एसपीजी आणि एनआयएमध्ये काम केले आहे. याचबरोबर आसाम पोलीस दलात अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे.
मागील महिन्यात गृह मंत्रालयाने सीआरपीएफच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार आयपीएस अधिकारी वितुल कुमार यांना सोपविला होता. तत्कालीन महासंचालक अनिश दयाल सिंह हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले होते.
सीआरपीएफ हे जवळपास 3 लाख जवानांसोबत भारतातील सर्वात मोठे निमलष्करी दल आहे. या दलाकडे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहीम, ईशान्येतील उग्रवादविरोधी मोहीम, नक्षलग्रसत राज्यांमधील मोहिमांची जबाबदारी आहे.









