युवा आघाडीची खासदार माने यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र सरकारने आता सीमाप्रश्न अधिक गांभीर्याने घेऊन केंद्रात याबाबत पाठपुरावा करावा. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला गती द्यावी, अशी मागणी तालुका म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर यांनी कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे शुक्रवारी कोल्हापुरात सीमाप्रश्नाबाबत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासदार माने यांची त्यांच्या घरी शुक्रवारी रात्री भेट घेऊन सीमाप्रश्नाबाबत चर्चा केली.
खासदार धैर्यशील माने यांना सीमाप्रश्नाबाबतचा अभ्यास आहे. अनेकवेळा ते बेळगावात येऊन त्यांनी सीमाप्रश्नाच्या आंदोलनात आणि राजकीय सभांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत संसदेत आवाज उठवावा, अशी मागणी युवा आघाडीतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान खासदार माने यांनी याबाबत स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्याची ग्वाही दिली. तसेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत अमित शहा यांच्याबरोबर लवकरच चर्चा केली जाणार आहे, असेही माने यांनी सांगितले.
यावेळी युवा आघाडीचे मयूर बसरीकट्टी, अरुण जाधव, गणेश सुतार, दीपक पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.









