मयत महांतेशचा मृतदेह काढला उकरून, तपासणीसाठी बिम्सला पाठवला
प्रतिनिधी / बेळगाव
हुक्केरी तालुक्यातील सुपारी खून प्रकरणांच्या तपासाला गती आली आहे. शनिवारी पोलीस, महसूल व आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खून झालेल्या युवकाचा मृतदेह उकरून काढण्यात आला. त्या युवकाचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा तपास करण्यासाठी सांगाडा बिम्सला पाठवण्यात आला आहे.
चार दिवसांपूर्वी यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन सुपारी खून प्रकरणांचा छडा लावला होता. यापैकी महांतेश भीमप्पा सुटगन्नावर (वय 38) मूळचा राहणार हळ्ळदकेरी, सध्या रा. रामगोनहट्टी (हट्टीआलूर) याचा मृतदेह शनिवारी उकरून काढण्यात आला.
महांतेशबरोबरच हट्टीआलूर येथील नागाप्पा विठ्ठल मऱ्याप्पगोळ (वय 34) व विठ्ठल लगमप्पा माळगी (वय 30) यांचाही सुपारी घेऊन खून करण्यात आला होता. मात्र, या दोघा जणांच्या मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्यात आले आहेत. केवळ महांतेशचा मृतदेह हुक्केरी येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला होता.
बेळगावचे प्रांताधिकारी श्रवणकुमार नायक, पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी समाधीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. एप्रिल 2024 मध्ये महांतेशचा मृत्यू झाला होता. त्याची पत्नी माला सुटगन्नावर हिने हट्टीआलूर येथील आकाश बसलिंगाप्पा गोकावी याला 70 हजार रुपयांची सुपारी दिली होती.
तीन सुपारी खून प्रकरणी दोन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. खुनानंतर नशेत मृत्यू झाला आहे, असा प्रचार करीत महांतेशचा मृतदेह दफन करण्यात आला होता. शनिवारी हुक्केरी स्मशानभूमीतून त्याचा सांगाडा ताब्यात घेण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला आहे.









