वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी दोन वेळच्या ऑलिंपिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची धाडसी लढत निराशेत संपली, तर सात्विकसाईराज रान्कीरेरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी प्रभावी कामगिरी करून उपांत्य फेरीत धडक मारत भारतीय संघाचे मनोबल उंचावले.
2022 चे विजेते सात्विक आणि चिराग यांनी आक्रमक फटके हाणत कोरियन जोडी जिन योंग आणि कांग मिन ह्युक यांना 21-10, 21-17 असे फक्त 41 मिनिटांत हरवले. गेल्या वर्षी चायना मास्टर्स आणि मलेशिया सुपर 1000 मध्ये शेवटच्या चार खेळाडूंच्या टप्प्यात स्थान मिळवल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याची ही त्यांची सलग तिसरी खेप आहे. या सातव्या मानांकित भारतीय जोडीचा उपांत्य फेरीत मलेशियाच्या तिसऱ्या मानांकित सेझे फेई गोह आणि नूर इज्जुद्दीन यांच्याशी सामना होईल.
त्यापूर्वी, पुरुष एकेरीत भारताचे एकमेव आशास्थान असलेल्या किरण जॉर्जला चीनच्या हाँग यांग वेंगकडून 13-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. असे असले, तरी सुपर 750 स्पर्धेतील क्वार्टरफायनल खेळण्याची त्याची ही पहिलीच खेप होती. ही कामगिरी त्याला आगामी स्पर्धांपूर्वी आत्मविश्वास देईल. दुसरीकडे, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पॅरिसची कांस्यपदक विजेती इंडोनेशियाची ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिच्याकडून चुरसपूर्ण सामन्यात सिंधूला पराभूत व्हावे लागले. माजी विजेत्या सिंधूने पहिली गेम एकतर्फी पद्धतीने गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले होते, परंतु निर्णायक गेममध्ये तिला नमते घ्यावे लागले. 62 मिनिटांच्या या रोमांचक लढतीत तिला 9-21, 21-19, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.
इतर सामन्यांमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पॅरिस ऑलिंपिक विजेत्या व्हिक्टर अॅक्सेलसेनला सिंगापूरचा माजी विश्वविजेता लोह कीन यूवर 21-19, 13-21, 21-8 असा विजय मिळविताना कठोर परिश्रम करावे लागले.









