कोल्हापूर सर्कल येथील युनिक शॉपवर मनपा आरोग्य विभागाची कारवाई : पंधरा ई-सिगारेट जप्त
बेळगाव : मानवी जीवाला हानिकारक असलेल्या ई-सिगारेटचा वापर, विक्री, आयात- निर्यात आणि उत्पादनावर भारतात बंदी आहे. मात्र, बंदी असतानाही कोल्हापूर सर्कल येथील युनिक शॉपमध्ये ई-सिगारेटची खुलेआम विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 17 रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सदर शॉपवर छापा टाकून झाडाझडती घेतली असता दुकानात 15 ई-सिगारेट आढळून आले. त्यामुळे ते अधिकाऱ्यांनी जप्त केले. ई-सिगारेटमध्ये असलेल्या हानिकारक रसायनांमुळे फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगदेखील होण्याचा संभव अधिक आहे. त्यामुळे ही सर्व बाब लक्षात घेऊन भारत सरकारने 2019 मध्ये देशात ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. ई-सिगारेटचे उत्पादन, आयात-निर्यात वाहतूक, विक्री, साठा, जाहिरातबाजी करणे आदी सर्व प्रकारावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
यामध्ये असलेल्या घातक रसायनांमुळे मानवी जीवाला धोका निर्माण होतो. ई-सिगारेट हे बॅटरीवर चालणारे उपकरण आहे. ते द्रव गरम करून वाफ तयार करते. त्या वाफेत निकोटीन फ्लेवरिंग आणि हानिकारक रसायने असतात. या वाफेचा श्वास घेतल्याने ते थेट फुफ्फुसात पोहोचतात. त्यामुळे या सर्व गंभीर बाबींचा विचार करून भारतात ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आली आहे. विदेशांमध्ये ई-सिगारेटचा वापर केला जात असला तरी 18 वर्षांवरील लोकांनाच ई-सिगारेट दिला जातो. धोकादायक ई-सिगारेटवर बंदी असतानाही बेळगावात खुलेआम विक्री केली जात आहे. कोल्हापूर सर्कल येथील युनिक शॉपमध्ये ई-सिगारेटची विक्री केली जात आहे, अशी खात्रीलायक माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यामुळे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सहकाऱ्यांसह सदर शॉपवर शुक्रवारी छापा टाकला. दुकानात झाडाझडती घेतली असता 15 ई-सिगारेट आढळून आले. त्यामुळे सदर ई-सिगारेट जप्त करण्यात आले. मनपा आयुक्तांच्या सूचनेनंतर सदर दुकान चालकावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ई-सिगारेट म्हणजे काय?
ई-सिगारेट म्हणजे बॅटरीवर चालणारे उपकरण, जे द्रव गरम करून वाष्प तयार करते. या वाफेत निकोटीन, फ्लेवरिंग्ज आणि इतर हानिकारक रसायने असतात. या वाफेला श्वास घेतल्याने ते फुफ्फुसात पोहोचतात. ई-सिगारेटला ई-सिग्स, व्हेप पेन, वाफे, टँक सिस्टम किंवा मोड असेही म्हणतात.
ई-सिगारेटमध्ये असलेली रसायने
निकोटीन, फ्लेवरिंग्ज, एसीटाल्डिहाईड, क्रोलिन, फॉर्मल्डिहाईड, प्रोपीलीन ग्लायकॉल, ग्लिसरीन किंवा ग्लिसरॉल.
ई-सिगारेटचे दुष्परिणाम
ई-सिगारेटमध्ये असलेल्या रसायनांमुळे फुफ्फुस, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होऊ शकतात.









