पण साईडपट्ट्या व्यवस्थित नसल्याने धोका
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळा ते मिलिटरी गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता पंधरा दिवसापूर्वी करण्यात आला आहे. हा रस्ता चांगल्या पद्धतीने केल्याने वाहनधारकांना हा रस्ता वेगाने वाहन चालविण्यास अनुकूल झाला आहे. त्यामुळे दुचाकी, चार चाकी, तीन चाकी व अवजड वाहने वेगाने धावत आहेत. रस्ता चांगला झाला असून उंची वाढली आहे. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूने मातीचा भर न टाकल्याने वाहन धारकांना धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी चार इंच, सहा इंच, आठ इंच ते दहा इंचापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोलगट भाग झाल्याने दुचाकीचालकांना धोकादायक झाला आहे. सुसाट येणाऱ्या वाहनाला चुकविण्यासाठी गाडी बाजूला घेताना गाड्या घसरून अपघात होत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदारांनी जातीने लक्ष देऊन दोन्ही बाजूला साईड पट्ट्या रस्त्याच्या बरोबरीने कराव्यात अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. कांही ठिकाणी दगडमिश्रित माती टाकली आहे. परंतु अद्याप रस्त्याच्या दोन्ही बाजूने पसरलेली नाही. तरी ती पसरावी व मोठे अपघात होण्याचे टाळावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नागेश माने यांनी केली आहे.









