बनावट शेअर ट्रेडिंग अॅपद्वारे फसवणूक
वृत्तसंस्था/ कोची
केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एम. शशिधरन नंबियार यांना सायबर घोटाळ्यात 90 लाख रुपयांचा फटका बसला आहे. हिल पॅलेस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआनुसार न्यायमूर्ती नंबियार यांनी आदित्य बिर्ला इक्विटी लर्निंग ग्रुप नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे बनावट शेअर ट्रेडिंग अॅपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे हस्तांतरित केल्याचे नमूद केले आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये अयाना जोसेफ आणि वर्षा सिंग या दोघांना संशयित आरोपी करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना ऑनलाईन शेअर मार्केटिंगद्वारे 850 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यांनी 4 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत 90 लाख रुपये हस्तांतरित केल्यानंतर आपण सायबर घोटाळ्यात अडकल्याची जाणीव त्यांना झाली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 316(2) (गुन्हेगारी विश्वासघात) आणि 318(4) (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66ड (संगणक संसाधनाचा वापर करून तोतयागिरी करून फसवणूक) अंतर्गत शिक्षापात्र गुह्यांचा समावेश आहे.









