वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आपचे दोन नगरसेवक रविंद्र सोलंकी आणि नरेंद्र गिरसा यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोलंकी अणि गिरसा यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि पश्चिम दिल्लीचे खासदार कमलजीत सहरावत यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
दोन्ही नगरसेवक हे आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये सामील राहिले आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या धोरणांमुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. सोलंकी आणि गिरसा हे केजरीवाल यांच्या धोरणबदलामुळे भाजपमध्ये आले असल्याचा दावा खासदार सहरावत यांनी केला आहे.
दिल्लीत विकास इच्छिणारे, दिल्लीची मनाने सेवा करू इच्छिणारे लोक भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. नरेंद्र तसेच रविंद्र या दोघांनीही स्वत:च्या मतदारसंघात कामं करून नाव कमाविले असल्याचे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष सचदेव यांनी काढले आहेत.









