कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठात दीक्षांत समारंभ पार पडला. विद्यापीठ परिसरात सकाळी 8 वाजल्यापासून अक्षरश: यात्रेचे स्वरूप आले होते. विद्यार्थी मित्र–मैत्रिणींनी कट्ट्यावर बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. जल्लोषी वातावरणातील तरूणाईने विद्यापीठ परिसर फुलून केला होता, पदवी स्विकारल्यानंतर छायाचित्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरूढ पुतळ्यासह मुख्य इमारत आली पाहिजे हे कटाक्षाने पाहिले जात होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पदवी प्रमाणपत्र घेतल्याचे कुतूहल व आनंद ओसंडून वाहत होता.
पदवीसाठीचे मानववस्त्र गळ्यात घालून दिवसभर विद्यार्थी विद्यापीठ परिसरात फिरत होते. एकमेकांची चेष्टामस्करीसह फोटोसेशन आणि सेल्फी काढण्यांत विद्यार्थी दंग होते. काही विद्यार्थी तर बऱ्याच दिवसांनी भेटल्याने त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला आभाळ ठेंगणे झाले होते. आनंदाचे डोही आनंद तरंग.. अशा वातावरणाने विद्यापीठ परिसर भारून गेला होता. पदवी स्विकारल्यानंतर आणि दीक्षांत समारंभाचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी केली होती. तसेच ज्ञानाचे भांडार वाढवण्यासाठी आपल्या आवडीची आणि अभ्यासाला पूरक असलेली पुस्तके अनेकांनी खरेदी केली. विद्यापीठ परिसरात जणू विद्यार्थ्यांचा मेळाच भरला होता. अनेकजण चहापान करण्यात गुंग झाले होते. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार होती त्यांचे पालक व मित्र– मेत्रिणींनीही सभागृहात हजेरी लावली. पदवीनंतर पुढे काय, असा प्रश्न विचारत पदवी मिळालेल्या अनेकांच्या डोळयांमध्ये उच्चशिक्षणाची स्वप्ने दाटली होती. उच्च पदवी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी होण्याचे ध्येय अनेकांचे असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. विद्यार्थी विद्यापीठ परिसरात नटून–थटून फिरत होते. अनेक विद्यार्थीनींनी साड्या परिधान करून पदवी प्रमाणपत्र स्विकारले.

- पदवी प्रमाणपत्र दुहेरी भाषेत तरीही चुक नाही
शिवाजी विद्यापीठाने यंदा पदवी प्रमाणपत्र मराठी व इंग्रजी असे दुहेरी भाषेत दिले आहे. या प्रमाणपत्रावर कोणतीही चुक होवू नये म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र तपासले आहे. त्यामुळे दुहेरी भाषेत पदवी प्रमाणपत्र असूनही प्रमाणपत्रांवर चुका नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
- कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी सांभाळली
दीक्षांत समारंभाची कामे विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वाटून दिली होती. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांच्या स्टॉलवर सकाळपासून प्रमाणपत्रांचे वाटप सुरू होते. पीएच. डी. व गुणवंत विद्यार्थ्यांना मानवस्त्र देवून त्यांना स्टेजवर एका लाईनमध्ये सोडण्याचे कामही कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित गेले. विद्यार्थ्यांना रांगेत उभा करणे, खुर्चा मांडण्यापासून ते स्टेजवरील बैठक व्यवस्थेपर्यंत प्रत्येक समिती सदस्यांनी आपआपली जबाबदारी पार पाडली.
- पुतळ्याजवळ फोटो काढण्यासाठी दुपारपर्यंत वेटींग
राज्यपाल विद्यापीठात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पहिल्यांदाच दुपारनंतर सोडल्याने विद्यार्थ्यांना सकाळपासून वेटींग करावे लागले. तरीही विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र घेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फोटो काढण्याचा आनंद लुटला.

- तीन वर्षाचा प्रवास पूर्ण झाल्याचा आनंद
पदवीचे शिक्षण घेताना तीन वर्षे आयुष्यात चढ–उतार आले. आज पदवी प्रमाणपत्र घेतल्यानंतर भरपूर आनंद झाला. तीन वर्षाचा प्रवास पूर्ण झाला. ऐवढेच नाही तर पुढील शिक्षण घेण्यास प्रेरणा मिळाली. पारितोषिक आणि पीएच. डी. पदवी घेणाऱ्या स्नातकांचा झालेला सत्कार पाहून पुढील शिक्षण घेण्याच्या आशा पालवल्या. तसेच प्रेरणाही मिळाली. पहिल्यांदा घेतलेल्या पदवी प्रमाणपत्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आणि प्रतिमा पाहून उर भरून आला, आणि अभिमान वाटला.
सोनल पाटील (विद्यार्थीनी)
- प्राध्यापक, संशोधन होण्याचे स्वप्न
मला संशोधनात अधिकच रस आहे, त्यामुळे भविष्यात मी स्टार्टअपसाठी प्रयत्न करणार आहे. पीएच. डी. सेट–नेट–गेट परीक्षा उत्तीर्ण होत प्राध्यापक होण्याचे माझे स्वप्न आहे. परंतू संशोधनाच्या जोरावर साईड बिझनेस म्हणून स्टार्टअप सुरू करणार आहे. आज राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती सुवर्णपदक स्विकारताना उर भरून आला. माझे यश मी माझे आई–वडील आणि शिक्षकांना अर्पण करतो.
बंडू कोळी (राष्ट्रपती पदक प्राप्त विद्यार्थी)
- समुपदेशक व्हायचे आहे
बारावीतच मी समुपदेशक व्हायचे ठरवले होते. त्यामुळे मी बारावीनंतर मानसशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभागात सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला समुपदेशक व्हायचे आहे. सध्या मी गोव्यात लहान मुलांना आधुन–मधुन समुपदेशन करते.
क्रिशा नोरोन्हा (कुलपती सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थीनी)








