बेळगाव तालुक्यातील मालमत्तंाची बोगस खरेदी-विक्री खानापूर उपनोंदणी कार्यालयात नोंद : मयत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून व्यवहार
खानापूर : खानापूर उपनोंदणी कार्यालयात गेल्या वर्षभरापासून बोगस खरेदी पत्र मोठ्या प्रमाणात होत आहेत. यात बेळगावसह अन्य विभागातील जमिनीसह इतर मालमत्ताची खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे खानापूर उपनोंदणी कार्यालयातील भोंगळ कारभाराची चर्चा सर्वत्र होत आहे. येथील उपनिबंधकांची नुकतीच बदली होऊन या ठिकाणी नवीन उपनिबंधक रुजू झाले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यापासून झालेल्या खरेदी विक्री कागदपत्राबाबत काही ठिकाणी तक्रारी नोंद होत आहेत. यासाठी खानापूर उपनोंदणी कार्यालयातील कर्मचारी आपला कारभार सुधारतील का, हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
खानापूर उपनोंदणी कार्यालयात गेल्या काही महिन्यापासून बोगस खरेदी विक्री झाल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बेळगाव तालुका, बेळगाव शहर यासह इतर तालुक्यातील जमिनींची तसेच इतर मालमत्तांची खरेदी-विक्री नोंद झाली आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील अथवा गावातील खरेदी विक्री नेंद जिल्ह्यातील कोणत्याही उपनोंदणी कार्यालयात होऊ शकते. याच नियमाचा फायदा घेऊन बेळगावातील काही एजंटांनी गेल्या सहा महिन्यापासून खानापूर उपनोंदणी कार्यालयात बोगस खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक मालमत्तांची बोगस खरेदी-विक्री खानापूर उपनोंदणी कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. यात बेळगाव येथील काही रियल इस्टेट एजंट सक्रीय झाले आहेत. काही मालमत्तांची विक्रीही मयत व्यक्तींच्या नंतरही व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून खरेदी विक्री करण्यात आली आहे. यात खानापूर कार्यालयातील अधिकारीही सहभागी असल्याची तक्रारही वरिष्ठांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर उपनेंदणी अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
मुचंडीतील महिलेची तक्रार
अशाच एका खरेदी विक्री संदर्भात नुकताच खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत सावाक्का निंगा नावलगी राहणार मुचंडी यांनी खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला असून, आपल्या नावे मुचंडी ता. बेळगाव येथे असलेली सर्व्हे नंबर 255/1 यामधील 11 गुंठे जमीन खानापूर उपनोंदणी कार्यालयात खरेदी-विक्री झाल्याची नोंद झाली आहे. याबाबत सावाक्का निंगा नावलगी यांनी खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
बनावट कागदपत्राद्वारे विक्री
सावाक्का नावलगी यांनी तरुण भारतशी बोलताना माहिती दिली की, आपल्या नावे मुचंडी येथे गोकाक रस्त्यालगत सर्व्हे नंबर 255/1 मध्ये 11 गुंठे जागा आहे. मात्र या जागेची दि. 2 मे 2024 रोजी बोगस खरेदी झाली आहे. यात माझ्या नावे एका दुसऱ्या स्त्रीला उभे करून खानापूर उपनोंदणी कार्यालयात खरेदी करण्यात आली आहे. यात माझा काहीही संबंध नाही. याबाबत मी खानापूर पोलिसात श्रीकांत भरत शिनोळकर, प्रकाश सदाशिव मुगळी, बसवराज सोमाण्णा मुगळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वरील तिघांनी माझ्या नावे असलेली जमीन खोट्या वटमुक्त्यार पत्राद्वारे खानापूर उपनोंदणी कार्यालयात विक्री केली असून यात श्रीकांत भरत शिनोळकर हे मुख्य सूत्रधार आहेत. यांनीच माझी जमीन हडप करण्यासाठी दि. 29-09-2016 चे खोटे वटमुक्त्यार पत्र तयार करून 02-05-2024 रोजी खानापूर उपनोंदणी कार्यालयात दुसऱ्याच स्त्रीचा फोटो लावून माझी जमीन विक्री केली आहे. मी विधवा असल्याने माझ्या नावे असलेल्या जमिनीच्या उताऱ्यात फेरफार झाल्याचे निदर्शनास आले नव्हते.
माझ्या नातवाने जेव्हा जमिनीचा उतारा काढला. तेव्हा संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे नोंद झाल्याचे समजताच कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आमच्या जमिनीची खरेदी झाल्याचे निदर्शनास आले. आम्ही सर्व कागदपत्रे एकत्र करून बोगस खरेदी झाल्याची तक्रार उपनोंदणी कार्यालय तसेच बेळगाव तहसीलदार कार्यालयात आणि खानापूर पोलीस स्थानकात नोंद केली आहे. अशी माहिती सावाक्का नावलगी तसेच यांच्या नातेवाईकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली आहे.
कार्यालय रियल इस्टेट एजंटांचे कुरण झाल्याची चर्चा
खानापूर उपनोंदणी कार्यालयात गेल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात बोगस खरेदी विक्री झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. यात खानापूर तालुक्यातील कडतन बागेवाडी येथील देशपांडे नामक मालक असलेल्या 21 एकर जमिनीची बोगस खरेदी विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. यासह इतरही बोगस खरेदी विक्रींच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंद झाल्या आहेत. त्यामुळे खानापूर उपनोंदणी कार्यालय हे रियल इस्टेट एजंटाचे कुरण झाल्याची सध्या चर्चा होत आहे. यासाठी खानापूर उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.









