म. ए. युवा समितीचे आवाहन
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना शुक्रवार दि. 17 रोजी अभिवादन केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नाबाबत जाग आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांना मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. युवा समितीच्या बैठकीत करण्यात आले. तसेच यावेळी युवा समितीच्यावतीने पाठेंबाही व्यक्त करण्यात आला. गुरुवार दि. 16 रोजी सायंकाळी टिळकवाडी येथील कावळे संकुल येथील म. ए. युवा समितीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंकुश केसरकर होते.
कुश केसरकर बोलताना म्हणाले, 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सीमाभागातील मराठी भाषिकांनी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे त्यांना दरवर्षी 17 जानेवारी रोजी अभिवादन केले जाते. त्याचप्रमाणे शुक्रवारी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. त्याचबरोबर सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने कोल्हापुरात धरणे आंदोलन केले जाणार आहे. या धरणे आंदोलनातही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत इतरांनीही आपले मत व्यक्त केले. यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, साईनाथ शिरोडकर, महेश जाधव यांच्यासह युवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









