वृत्तसंस्था/बडोदा
2025 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत देवदत्त पडिकल आणि रवीचंद्रन सिमरन यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर कर्नाटकाने हरियाणाचा पाच गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भने महाराष्ट्राचा 69 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हरियाणा संघाने 50 षटकात 9 बाद 237 धावा जमवित कर्नाटकाला विजयासाठी 238 धावांचे आव्हान दिले. पण त्यानंतर कर्नाटकाने 47.2 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 238 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला.
हरियाणाच्या डावामध्ये हिमांशु राणाने 44, कर्णधार अंकितकुमारने 48 धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. अनुज ठकराल आणि अमित राणा या शेवटच्या जोडीने 39 धावांची भागिदारी केल्याने हरियाणाला 237 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्नाटकातर्फे अभिलाश शेट्टीने 34 धावांत 4 तर श्रेयस गोपालने 36 धावांत 2 व प्रसिद्ध कृष्णाने 40 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तदाखल दाखल खेळताना कर्नाटकाच्या डावामध्ये देवदत्त पडिकलने 113 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 86 तर रविचंद्रन सिमरनने 94 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 76 धावा झळकविल्या. पडिकल आणि सिमरन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 128 धावांची भागिदारी केली.









