बिजापूर जिल्ह्यातील मारुडवाका जंगलात कारवाई
वृत्तसंस्था/बिजापूर, रायपूर
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गुरुवारी संयुक्त मोहीम राबवत नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली. मारुडवाकाच्या जंगलात 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सायंकाळी देण्यात आली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रsही जप्त करण्यात आली आहेत. दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईत एक हजार सैनिक सहभागी झाले होते. या सैनिकांनी 50 ते 70 नक्षलवाद्यांना घेरल्याचे वृत्त आहे. सायंकाळनंतरही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 9 वाजता चकमक सुरू झाली. बिजापूरच्या एएसपींनी चकमकीला दुजोरा दिला आहे. या नक्षलविरोधी मोहिमेमध्ये बिजापूर-सुकमा येथील डीआरजी जवान, सीआरपीएफचे 5 वे कोब्रा युनिट, सीआरपीएफचे 229 व्या बटालियनचे जवान सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान गुरुवारीच बिजापूर जिह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या प्रेशर इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसच्या (आयईडी) स्फोटात सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले होते. यापूर्वी 12 जानेवारी रोजी बिजापूरमध्येच झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी ठार झाले होते. 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये आयईडीने एक वाहन उडवून देताना केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करत जंगलभागात विशेष मोहीम राबविली जात आहे.
नव्या मोहिमेत छत्तीसगडमधील दंतेवाडा जिह्यात नक्षलवाद्यांवर सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बिजापूरनजिक तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्धची कारवाई तीव्र केली आहे. नक्षलवाद्यांचे वास्तव्य असलेल्या परिसराला सुरक्षा जवानांनी पूर्णपणे वेढा घातला आहे. बिजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर तीन जिह्यांतील सैनिक नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करत आहेत.









