अनेक नेत्यांच्या निकटवर्तीयांवर हल्ल्याचा कट : गुप्तचर यंत्रणांकडून मिळाले इनपूट
वृत्तसंस्था/चंदीगड
पंजाबमध्ये पोलीस स्थानकांना लक्ष्य केल्यावर आता विदेशात बसलेल्या दहशतवाद्यांनी स्लीपर सेलद्वारे राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीय व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मागील 50 दिवसांमध्ये 12 हून अधिक स्फोट झाले आहेत. बुधवारी राजी मजीठा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या जैंतीपूरमध्ये खासदार सुखविंदर सिंह रंधावा यांच्या निकटवर्तीयाला लक्ष्य करण्यात आले. या स्फोटाची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनलने स्वीकारली आहे.
दहशतवादी पंजाबमध्ये मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा इनपूट केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी राज्य पोलिसांना दिला आहे. हल्ल्यांच्या घटनांच्या सर्व आरोपींना पकडण्यात आल्याचा दावा पोलीस करत असले तरीही हल्ले पूर्णपणे बंद झालेले नाहीत. तर पंजाब पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांकडून इनपूट मिळाल्यावर पोलीस स्थानक आणि चौक्यांची सुरक्षा वाढविण्याचे निर्देश दिले होते. यानंतर राज्यभरात खासकरून अमृतसर, तरनतारन आणि गुरदासपूरमध्ये पोलीस स्थानकांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
पंजाबमधील पोलीस अधिकाऱ्यांनुसार विदेशात लपून बसलेले दहशतवादी राज्यात सक्रिय स्लीपर सेलद्वारे हे हल्ले घडवून आणत आहेत. विदेशातूनच या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली जात आहे. गँगस्टरना चिथावणी देणारी अणि हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या किमान 483 इंटरनेट मीडिया अकौंट्सना ब्लॉक करण्यात आले आहे. यातील काही विदेशातून संचालित व्हायची. पंजाबमध्ये स्फोट घडवून आणत हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या हॅपी पशियावर एनआयएने 5 लाखाचे इनाम जाहीर केले आहे.









